रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन सांबारांचा मृत्यू

रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन सांबारांचा मृत्यू

Published on

हिर्डोशी, ता.२७ : वरंधा घाटातील शिरगाव (ता.भोर) येथील जननीदेवी मंदिराजवळ नीरा देवघर धरणाच्या पाण्यालगत रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत अवस्थेत आढळलेल्या दोन सांबरांना शनिवारी (ता.२७) दुपारी तीन वाजता वनविभागाकडून अग्नी देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नीरा देवघर रिंग रोडवर शिरगाव हद्दीत धरणाच्या काठाशेजारील जननीमाता मंदिराचे बांधकाम सुरू आहे. तेथील कामावरील कामगार व ग्रामस्थांना शुक्रवारी (ता.२६) दोन मृत सांबरे आढळून आली. याबाबत सरपंच नीलेश पोळ यांच्याकडून शुक्रवारी रात्री नऊ वाजता समजल्यावर विलास मादगुडे यांनी हिर्डोशी वनविभागाचे वनपाल रोहन इंगवले यांना खबर दिली. रात्र झाल्याने वनविभागाकडून शनिवारी सकाळी वनरक्षक तुकाराम बादणे व मजूर भाऊ शिरवले यांनी घटनास्थळी जाऊन खात्री केली असता एका सांबर पाण्यात तर दुसरे काठावर मृत अवस्थेत आढळून आले. त्यानंतर दोन्ही सांबरांचे डॉक्टरांच्या सल्ल्याने शवविच्छेदन करून लाकडाचे सरण रचून वनविभागाकडून अग्नी देण्यात आली. एका सांबराला दहा पंधरा रानटी कुत्र्यांनी डोंगरातून पाण्यापर्यंत पाठलाग केल्याचे पाहिले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com