
नारायणगाव येथे दोघांवर वीज चोरीप्रकरणी गुन्हा
नारायणगाव, ता. १३ : नारायणगाव (ता. जुन्नर) येथील वीज कंपनीच्या कार्यक्षेत्रात ८० हजार ७७० रुपये किमतीची ५ हजार १३५ युनिटची वीज चोरी केल्याप्रकरणी हॉटेल मालक व शेतकरी, अशा दोन जणांवर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी माहिती दिली की, या प्रकरणी वीज कंपनीचे सहायक अभियंता ऋषिकेश बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राकेश दरंदाळे (रा. नारायणगाव), गौतम भुजबळ (रा. वारूळवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर गुन्हा दाखल केला. भुजबळ याचे नारायणगाव येथे पुणे-नाशिक महामार्गालगत हॉटेल आहे. त्याने मीटरजवळून बायपास कनेक्शन करून वीज वापर सुरू करून ६७ हजार ६७० रुपयांची ३ हजार ५०१ युनिट वीज चोरी केली असल्याचे तपासणीत आढळले. तर, दरंदाळे याने वीजवाहक तारेवर आकडा टाकून कृषी पंपासाठी १३ हजार रुपयांची १ हजार ६३४ युनिट वीज चोरी केल्याचे तपासणीत आढळले.
या दोघांनाही वीज चोरी केल्याप्रकरणी तडजोड रक्कम भरण्यासाठी मुदत दिली होती. मात्र, त्यांनी
वीज चोरीचे बिल भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांच्या विरोधात सहायक अभियंता ऋषिकेश बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक ताटे यांनी दिली.