आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राऊत दांपत्यांची निवड

आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी राऊत दांपत्यांची निवड

नारायणगाव, ता. १४ : ‘शून्य सर्पदंश मृत्यू दर प्रकल्प’ व गरोदरपणातील सर्पदंश व उपचार या विषयावरील व्याख्यानासाठी नारायणगाव (ता. जुन्नर)येथील जागतिक आरोग्य संघटना सर्पदंश तज्ञ समितीचे सदस्य, सर्पदंश व विषबाधा तज्ञ डॉ. सदानंद राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी राऊत यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले आहे. १९ मे ते २५ मे दरम्यान सिंगापूर येथे विषबाधा तज्ञांची सात दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.

मागील पस्तीस वर्षापासून ग्रामीण व दुर्गम भागात वैद्यकीय सेवा पुरवीत असलेल्या डॉ. राऊत यांच्या निवडीबद्दल जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिकल असोसिएशनच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि इंटरनॅशनल सोसायटी ऑफ टॉक्सिनोलॉजी यांच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय उपचार पद्धती माहितीची आदान-प्रदान करण्यात येणार आहे. याचा लाभ रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी होणार आहे.

या परिषदेत सिंगापूर, युके, जपान, इटली, बेल्जियम ,ऑस्ट्रेलिया, न्यू पपा गुनिया, पोर्तुगाल, इस्राईल, ब्राझील, तैवान, नायजेरिया, अमेरिका, मलेशिया, नेदरलँड, साऊथ आफ्रिका, रशिया, फ्रान्स, नॉर्वे, भूतान, नेपाळ, चीन आदी साठ देशातील सुमारे पाचशे शास्त्रज्ञ, विषबाधा तज्ञ डॉक्टर्स, जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ञ उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेत डॉ. सदानंद राऊत यांचे ‘शून्य सर्पदंश मृत्यू दर प्रकल्प’ या विषयावर तर डॉ. पल्लवी राऊत यांचे विषबाधा क्षेत्रातील महिला, घोणस या विषारी सर्पदंशाची लक्षणे, उपचार व गुंतागुंत, गरोदरपणातील सर्पदंश व उपचार या विषयावर व्याख्याने होणार आहेत.

डॉ. राऊत दांपत्य अतिशय प्रतिकूल परिस्थितीत राज्यात शून्य सर्पदंश प्रकल्प राबवीत आहे. विषारी सर्प दंश झालेल्या १२ हजारहून अधिक रुग्णांना त्यांनी जीवदान दिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यन्त सर्पदंशापासून होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ५० टक्के कमी करण्याचे ध्येय ठरविले आहे. मात्र डॉ. राऊत दांपत्याने गेली तीस वर्षांपासून सातत्याने प्रयत्नपूर्वक सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे, अपंगत्वाचे, किडनी निकामी होण्याचे प्रमाण कमी केले आहे.

-तीस वर्षापासून दुर्गम भागात वैद्यकीय सेवा व उपचार
सर्पदंश झालेल्या रुग्णांना तातडीने योग्य ते उपचार उपलब्ध करणे, सर्पदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी, अंधश्रद्धा कमी होऊन योग्य प्रथमोपचार व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करणे, शासकीय आणि खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मागील तीस वर्षापासून ते कार्यरत आहेत. विषारी सर्पदंशावरील उपचार पद्धती त्यांनी विकसित केली आहे. भारत सरकारच्या सर्पदंश प्रतिबंध कार्यक्रमातही त्यांचे योगदान आहे. यापूर्वी भारतासह ऑस्ट्रेलिया, ऑक्सफर्ड, नेपाळ, अबुधाबी या देशांमध्ये त्यांची व्याख्याने झाली आहेत.

-‘अरोग्यारत्न’ पुरस्काराने सन्मानित
त्यांच्या या योगदानाबद्दल ‘शिवनेरीभूषण’ व महाराष्ट्र शासनाचा ‘अरोग्यारत्न’ या पुरस्काराने राऊत दाम्पत्याला सन्मानित केले आहे. तसेच, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने त्यांची सर्पदंश तज्ञ समितीवर सदस्य म्हणून निवड केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com