बंदिस्त गोठ्यातील पशूधन असुरक्षित

बंदिस्त गोठ्यातील पशूधन असुरक्षित

Published on

नारायणगाव, ता. ११: बंदिस्त गोठ्याची सहा फूट उंचीची जाड तारेची जाळी वाकवून गोठ्यात प्रवेश करून बिबट्याने शेळ्यावर केलेल्या हल्ल्यात उस्मानाबादी जातीच्या दोन दुभत्या शेळ्या मृत झाल्या.ही घटना गुरुवारी (ता.११) पहाटे वारुळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अभंगवस्ती येथे घडली. बंदिस्त गोठ्यातील शेळ्याही आता सुरक्षित राहिल्या नसल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर मेजर उमेश पांडुरंग अवचट यांनी अभंगवस्ती येथील शेतात बंदिस्त गोपालन व शेळीपालन सुरू केले आहे. या भागात बिबट्याचा वावर असल्याने शेळ्यांच्या सुरक्षतेसाठी त्यांनी बंदिस्त गोठा तयार केला आहे. सहा फूट उंचीची लोखंडी जाळी लावून गोठा बंदिस्त केला आहे. बिबट्याने आज पहाटेच्या सुमारास जाळीच्या खालच्या बाजूने माती उकरून गोठ्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र गोठ्यात सिमेंटचा कोबा असल्याने त्याला गोठ्यात प्रवेश करता आला नाही. नंतर बिबट्याने सहा फूट उंचीची लोखंडी जाळी पंजाने खाली वाकवून गोठ्यात प्रवेश केला. बिबट्याच्या हल्ल्यात गोठ्यातील दोन शेळ्या मृत झाल्या. यापैकी एक शेळी बिबटया जवळच्या उसाच्या शेतात घेऊन गेला.आज सकाळी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी घटनास्थळी जाऊन मृत शेळ्यांचा पंचनामा केला.अभंगवस्ती येथे शेतात बिबट्यांचे ठसे आढळून आले असून या भागात किमान दोन बिबट असण्याची शक्यता आहे. लहान मुलांची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.


वारुळवाडी परिसरात सहा महिन्यापूर्वी दोन बिबटे पकडण्यात आले होते. पकडलेल्या बिबट्यांची जागा आता दुसऱ्या बिबट्यांनी घेतले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी नारायणगाव परिसरात पाच लावण्यात आले आहेत. कांदळी व अभंग वस्ती येथील बंदिस्त गोठ्यात प्रवेश करून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला आहे. या घटनेवरून आपल्या पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आता बंदिस्त गोठे अधिक सुरक्षित करण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- ज्ञानेश्वर पवार, वनरक्षक

बिबट्याच्या हल्ल्यात माझ्या दोन शेळ्या मृत झाल्या असल्या तरी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावू नये. कारण पिंजरा लावल्यास त्या ठिकाणची रिक्त जागा पुन्हा दुसरे बिबटे घेतील. नवीन आलेले बिबटे अधिक आक्रमक ठरू शकतात. बिबट्यांची समस्या ही वाढतच जाणार आहे. नियंत्रणासाठी बिबट्यांची नसबंदी करण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
- उमेश अवचट, सेवानिवृत्त मेजर
05233

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.