तमाशा कलावंतांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

तमाशा कलावंतांकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष
Published on

नारायणगाव, ता. १७ : ‘‘राज्यातील तमाशा कलावंतांना मागील सहा महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. मानधनाअभावी ज्येष्ठ तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. तमाशा कलावंतांच्या व्यथा व अडचणींकडे लक्ष द्यायला राज्य सरकारला वेळ नाही,’’ अशी टीका खासदार नीलेश लंके यांनी केली.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील विठाबाई नारायणगावकर तमाशा पंढरीला खासदार लंके यांनी भेट दिली. यावेळी तमाशा पंढरीचे अध्यक्ष अविष्कार मुळे, राज्यातील प्रमुख फड मालक मोहित नारायणगावकर, संभाजी राजे जाधव, मुसा इनामदार, मयूर महाजन, नागेश कळसकर, तानाजी मुसळे यांच्याशी खासदार लंके यांनी चर्चा करून माहिती घेतली. यावेळी फड मालकांच्या वाहनांना टोल माफी मिळावी, तमाशा फड मालकांना पॅकेज मिळावे, मानधन वेळेत मिळावे, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचे नारायणगाव येथे स्मारक व्हावे, विठाबाई नारायणगावकर महामंडळाची स्थापना करावी, आदी मागण्या फडवालकांनी केल्या. या वेळी सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे, भाऊ वारुळे आदी उपस्थित होते.
खासदार लंके म्हणाले, ‘‘तमाशा कला लोप पावत चाललेली आहे. महाराष्ट्राची लोककला जिवंत राहिली पाहिजे. फड मालक व कलावंतांच्या अनेक व्यथा व अडचणी आहेत. उमेदीच्या काळात तमाशा कलावंतांना मानसन्मान मिळतो. वृद्धापकाळात कलावंतांची उपेक्षा होते. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. तमाशा कलावंतांना आयुष्यभर मानसन्मान मिळाला पाहिजे. यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तमाशा कलावंतांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. फड मालक व तमाशा कलावंत यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संसदीय अधिवेशनादरम्यान आमचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली फड मालकांच्या शिष्टमंडळाची बैठक केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांसमवेत घेतली जाईल.’’

राज्यातील बहुतेक फड मालक आर्थिक विवंचनेत आहेत. सन २००७- ०८मध्ये राज्य सरकारने हंगामी व तंबूच्या तमाशांना पॅकेज दिले होते. त्यानंतर अनेक वेळा घोषणा होऊनदेखील फड मालकांना पॅकेज दिले नाही. शेवटच्या घटका मोजत असलेल्या फड मालकांना पॅकेज मिळावे.
- संभाजी जाधव, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तमाशा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com