सोयाबीनवर बांधा कुज, खोड सडीचा प्रादुर्भाव
नारायणगाव, ता.१: जिल्ह्यात रिमझिम पाऊस, सततचे ढगाळ हवामान, सूर्यप्रकाशाचा अभाव या मुळे सोयाबीन पिकावर बांधा कुज (कॉलर रॉट) व मूळ, खोड सड रोगाचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सोयाबीन पीक पिवळे पडणे व मर होण्याचे प्रमाण वाढले आहे. उत्पन्नातील संभाव्य घट टाळण्यासाठी कीड व रोगाचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच एकात्मिक व्यवस्थापन करा, असा सल्ला नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. दत्तोत्रय गावडे यांनी दिला आहे.
सोयाबीन पीक दीड ते दोन महिन्याची झाले आहे. सध्या सोयाबीन पिकात जमिनीतून येणारे रोग, पाने फांदीवरील रोग, शेंगावरील रोग आदी रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पावसाची परिस्थिती व वातावरण भिन्न आहे जास्त पाऊस असलेल्या भागात जमिनीतून येणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त आहे.
बांधा कुज (कॉलर रॉट) रोग लक्षणे
स्क्लेरोशियम रॉल्फसाय या बुरशीमुळे या रोगाची लागण होते. काळी जमीन व पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो.रोप किंवा झाडाचे मूळ व खोड यांच्या बुंध्याजवळ पांढरट बुरशीची वाढ झालेली दिसून येते. झाडाची वाढ खुंटते आणि झाड पूर्णपणे कोमेजून सडून मरून जाते. रोगाचा प्रसार रोगग्रस्त अवशेष, आणि वाऱ्यामार्फत पसरणारे बुरशीचे बीजाणू यांच्या मार्फत होतो.
मूळ व खोडसड रोग : हा बुरशीजन्य रोग पिथीयम, फाटोपथोरा, रायझोक्टोनिया, फ्युसॅरिअम मॅक्रोफोमिना फसिओलिना या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव रोप अवस्थेत जास्त होतो. खोडावर आणि मुळावर काळी बुरशी बीजे दिसून येतात. रोगाची बुरशी झाडाच्या प्रादुर्भावग्रस्त मृत अवशेषांवर सुप्त अवस्थेत जिवंत राहते व रोगाची लागण करते. बियाणांमार्फत सुद्धा या रोगाची लागण होते.
उपाय:
१. पेरणीपूर्वी बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशींनाशकांची १० मिली/ग्रॅम प्रतिकिलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करणे
२. पेरण्यापूर्वी शेतातील काडी कचरा गोळा करून नष्ट करणे,
३. पेरणीपूर्वी जमिनीमध्ये निंबोळी ढेप किंवा सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक
४. प्रादुर्भाव दिसून आल्यास ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २० कि.ग्रॅ. प्रतिहेक्टर याप्रमाणे जमीन ओली असताना जमिनीत मिसळावे.
५. प्रादुर्भाव अधिक असल्यास रासायनिक बुरशींनाशक कार्बेन्डाझीम ५० टक्के डब्लूपी एक ग्रॅम प्रतिली पाणी याप्रमाणे आळवणी करावी.
६. सोयाबीन पिकातील शेतातील पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी उपाययोजना करावी.
06981