नारायणगावात धना- मेथीच्या बाजाराचे गुरुवारी उद्घाटन
नारायणगाव, ता. ६ : ‘‘जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारातील धना- मेथी लिलाव बाजाराचे पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या तेरा एकर जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय संचालक मंडळांनी घेतला आहे. यामुळे शेतकरी, व्यापारी व वाहनचालक यांची मागील अनेक वर्षाची गैरसोय दूर होणार आहे,’’ अशी माहिती सभापती संजय काळे यांनी दिले.
धना- मेथीच्या नवीन उपबाजाराचे गुरुवारी (ता.९) सायंकाळी पाच वाजता आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन तर उपबाजारात जा- ये करण्यासाठी मंजूर झालेल्या पुणे नाशिक महामार्गालगतच्या उपरस्त्याचे भूमिपूजन खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अतुल बेनके असणार आहेत. या कार्यक्रमाला पुणे म्हाडाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बाजार समितीच्या नारायणगाव उप बाजाराला मांजरवाडी राज्य महामार्ग रस्त्यालगत १० एकर जागा, जुन्या पुणे नाशिक महामार्ग लगत सुमारे सात एकर जागा, नवीन पुणे नाशिक महामार्ग लगत १३ एकर जागा अशी सुमारे ३० एकर जागा झाली आहे. नवीन दहा एकर जागेत शीतगृह व कांदा लिलाव सुरू करण्याचा विचार आहे. यामुळे भविष्यकाळात नारायणगाव,वारूळवाडी, मांजरवाडी, वळणवाडी परिसराच्या विकासाला व व्यापार उद्दीम वाढीला चालना मिळणार आहे, असे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संजय काळे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची अडचण विचारात घेऊन धना मेथी बाजाराकडे ये जा करण्यासाठी येथील पुणे नाशिक महामार्गाला समांतर असलेला ५०० मीटर लांबीचा उपरस्ता करण्यात येणार आहे. त्याची रुंदी दहा मीटर असून यामध्ये सात मीटर रुंदीचा डांबरी रस्ता व उर्वरित जागेत संरक्षक बांधकाम, सांडपाणी व्यवस्था असणार आहे, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक सल्लागार दिलीप शिंदे यांनी सांगितले.
07298