नारायणगावात वडाच्या झाडाला लावली आग

नारायणगावात वडाच्या झाडाला लावली आग

Published on

नारायणगाव, ता. ११ : येथील पुणे-नाशिक महामार्गालगत सुमारे साठ वर्षे वयाच्या वडाच्या झाडाला अज्ञात व्यक्तींनी आग लावली. नारायणगाव, वारूळवाडी ग्रामपंचायत, पोलिस ठाणे, वन विभाग, ग्राम सुरक्षा दलाचे जवान यांनी संयुक्तपणे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने या झाडाला जीवदान मिळाले.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील कलासागर मंगल कार्यालयासमोर जुन्या पुणे-नाशिक महामार्ग लगत असलेल्या वडाच्या झाडाला बुंध्यापासून आग लागली असल्याचे शनिवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आयुब शेख, आदिल शेख यांनी आपाद मित्र व पोलिस पाटील सुशांत भुजबळ यांना सांगितले. त्यानंतर घटनास्थळी नारायणगाव ग्रामपंचायतचा पाण्याचा टँकर उपसरपंच योगेश पाटे यांनी पाठवला. आपदा मित्र भुजबळ, रेस्क्यू टीमचे सदस्य आदित्य डेरे, शंतनू डेरे, सत्यवान शिंदे, वारुळवाडीचे सरपंच विनायक भुजबळ, विकास तोडकरी, पप्पू भूमकर,अजित वाजगे, आयुब शेख यांनी पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणली.
एप्रिल महिन्यात याच झाडापासून २५ फूट अंतरावरील वडाच्या झाडाला आग लावण्यात आली होती. येथील महामार्गालगत राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीत अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गाळे उभारण्यात आले आहेत. वडाची ही झाडे व्यवसायाला अडचण ठरत असल्याने या झाडांना आग लावली जात असल्याची या भागात चर्चा आहे. वडाच्या झाडाच्या बुंध्यापाशी कचरा साठवला जातो. वाहनाचे जुने टायर ठेवले जातात. त्यानंतर पहाटेच्या सुमारास आग लावली जाते. यापूर्वी याच परिसरात झाडाला आग लागल्याच्या चार ते पाच घटना झाल्या आहेत. मांजरवाडी राज्य महामार्गालगत आसलेली वडाची दोन भव्य झाडे तोडण्यात आली होती.

झाडे पेटतात की पेटवली जातात ?
शेकडो पशुपक्ष्यांचे वस्तीस्थान असलेल्या, प्रवासी व वाटसरूंना शितल छाया देणारी येथील वटवृक्षांना वारंवार आग कशी लागते. झाडे पेटतात की पेटवली जातात याचा शोध वनविभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने घ्यावा, भव्य वटवृक्षांना आग लावणाऱ्या निसर्ग संपत्तीला धोका पोहोचवणाऱ्या या समाजकंटकांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी वृक्षप्रेमींनी केली आहे.

7324

Marathi News Esakal
www.esakal.com