नारायणगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन
नारायणगाव, ता. ३० : ‘‘पद्मभूषण डॉ. मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनच्यावतीने पुढील तीन महिन्यात मोतीबिंदू झालेल्या चारशे ज्येष्ठ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाईल.’’ असे आश्वासन फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. संदीप डोळे यांनी दिली. नारायणगाव व वारूळवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा २० वा वर्धापन दिन येथील श्री हरीस्वामी सभागृहात पार पडला.
फेस्कॉमचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सकाळ रिलिफ फंडला पाच हजार रुपयांची मदत दिली. मदतीचा धनादेश ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे यांच्या हस्ते पत्रकार रवींद्र पाटे यांनी स्वीकारला. ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ८१ वर्षावरील ८७ ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप, दहा ज्येष्ठ नागरिकांना कमोड खुर्च्यांचे वाटप केले. पुणे जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल परशुराम कोते यांचा सत्कार केला.
यावेळी फेस्कॉमचे पुणे प्रादेशिक विभाग अध्यक्ष हनुमंत कुंभार, माजी सभापती शिवाजीराव खैरे, ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, विश्वस्त प्रकाश पाटे, श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश पाटे, उपाध्यक्ष मारुती डेरे, कोषाध्यक्ष शिवाजीराव गायकवाड, सचिव परशुराम कोते, फेस्कॉमचे सचिव चंद्रकांत महामुनी, अरुण रोडे आदी उपस्थित होते.
रत्नाकर सुगंध यांनी सूत्रसंचालन केले. नियोजन ज्येष्ठ नागरिक विठ्ठल औटी, अरविंद मेहेर, शिवाजीराव वाजगे, सुदाम खेबडे, बबन पानसरे, शंकरराव कोल्हे, सदाशिव भोसले, विलास पाटे, सुरेश कोल्हे, सुहास ब्रम्हे यांनी केले.
९१ व्या वर्षीही ठणठणीत
आजच्या तरुण पिढीला 40 व्या वर्षी बीपी-शुगरची गोळी सुरू करावी लागते. मात्र शारीरिक व्यायामामुळे ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी सभापती शिवाजीराव खैरे, शेतकरी देवबा खैरे यांची प्रकृती आजही ९१ व्या वर्षी ठणठणीत आहे. माजी सभापती खैरे यांना चष्मा नाही, औषधाची कोणतीही गोळी सुरू नाही. हातात काठी नाही, मोटार गाडी स्वतः चालवत कार्यक्रमाला येतात. देवबा खैरे आजही जोर बैठका काढतात, लाठीकाठी फिरवितात. यावेळी त्यांचा सत्कार केला.

