‘बोगस मतदारांची नावे हटवा अन्यथा..’
नारायणगाव, ता. १ : ‘‘नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील सहा प्रभागांमधील मतदार यादीत सुमारे अडीच हजार बोगस मतदार आहेत. हे मतदार फक्त मतदान करण्यासाठीच येतात. ६ नोव्हेंबरपूर्वी मतदार यादीची पडताळणी करून बोगस मतदारांची नावे हटवावी. अन्यथा ७ नोव्हेंबरपासून नारायणगाव येथील मंडल कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल,’’ असा इशारा येथील अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मेहेत्रे यांनी दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जुन्नरचे तहसीलदार, नारायणगावचे मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांना पाठविले आहे.
यासंबंधी माहिती देण्यासाठी रमेश मेहेत्रे यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी मेहेत्रे म्हणाले की, डिसेंबर २०२३ व फेब्रुवारी २०२५ मध्ये एटीएसने कारवाई करून नारायणगाव परिसरातील १० बांग्लादेशी नागरिकांना अटक केली होती. या नागरिकांकडे स्थानिक रहिवाशी दाखला व आधार कार्ड आढळून आले. या पार्श्वभूमीवर मतदार यादीची पडताळणी करून यादीतील बांग्लादेशी, परप्रांतीय मतदार, दुबार मतदार, शेजारील गावातील मतदार, इतर तालुक्यातील व जिल्हयातील मतदार, लग्न होऊन गेलेल्या मुली, कायमस्वरूपी स्थलांतरीत व्यक्ती व मृत मतदार यांची नावे कमी करण्यात यावी. यासाठी यापूर्वी मी अनेकदा निवेदने दिली. मात्र, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

