बिबट्याच्या प्रश्नावर ‘बेंगॉल टायगर’च्या मुत्राचा उतारा
नारायणगाव, ता. ९ : नारायणगाव (ता. जुन्नर) वनपरिक्षेत्रात बिबट्यांची वाढलेली संख्या मोठी डोकेदुखी ठरली आहे. बिबट नियंत्रणासाठी केलेल्या विविध उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. पकडलेले बिबटे कुठे ठेवायचे? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बिबट घराजवळ येऊच नये, यासाठी जुन्नर वनविभागाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर प्रथमच बेंगॉल टायगरच्या मूत्राचा (युरीन) वास असलेल्या ‘ॲनिमल आउट’ या द्रव्याचा वापर नारायणगाव वनपरिक्षेत्रातील वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील चिमणवाडी येथे केला आहे. त्यामुळे रोज गोठा व घराजवळ येणारा बिबट्या मागील पाच दिवसांपासून फिरकलाच नाही.
सद्यःस्थितीत नारायणगाव वनपरिक्षेत्रातील धनगरवाडी, मांजरवाडी, नारायणवाडी, आर्वी ठाकरवाडी येथे सहा पिंजरे लावले आहेत. बिबट्याची माहिती मिळण्यासाठी अभंग वस्ती, निंबाळकर वस्ती, चिमणवाडी, घोडवाट, मांजरवाडी या ठिकाणी सहा आर्टिफिशियल इंटेलिजंट (एआय) प्रणाली कार्यान्वित केली आहे. शेतातील बारा ठिकाणी ॲनायडर्स यंत्रणा कार्यान्वित केली आहे. शेतकऱ्यांना नेकबेल्टचे वाटप केले आहे. ही उपाययोजना करूनदेखील बिबटे शेतातील घराजवळ भक्षाच्या शोधात रोज येत आहेत. त्यामुळे बिबट्या घराजवळ येऊ नये म्हणून ॲनिमल आउट या द्रव्याचा वापर प्रायोगिक तत्त्वावर केला जात आहे, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.
बेंगॉल टायगरचा वावर असलेल्या ठिकाणी बिबट्या जात नाही, असे अभ्यासांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे बेंगॉल टायगरच्या मुत्राचा(युरीन) वास असलेल्या ॲनिमल आउट या द्रव्याचा वापर केला जात आहे. एक लिटर पाण्यात दहा मि.लि. ॲनिमल आउटचे द्रावण घेतले जाते. या द्रावणात कापड भिजवून घराजवळ, गोठ्याजवळ ठेवले जाते. या द्रावणाच्या वासामुळे बिबट घराजवळ येत नाही. त्यामुळे संभाव्य हल्ले टाळण्यास मदत होईल.
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

