नारायणगावातील गोडाऊन भस्मसात

नारायणगावातील गोडाऊन भस्मसात

Published on

नारायणगाव, ता. २१ : नारायणगाव-ओझर रस्त्यालगत असलेल्या मारुती एंटरप्राईजेसच्या गोडाऊनला शुक्रवारी (ता. २१) पहाटे दीडच्या सुमारास आग लागून चार गाळ्यांमधील गोळ्या, बिस्किटे, साबण, चॉकलेट व इतर जीवनावश्यक किराणा माल साहित्य जळून खाक झाले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
नारायणगाव येथील तरुण व्यावसायिक तुषार दिवटे यांनी नारायणगावातील विविध पतसंस्थांचे कर्ज काढून बिस्किटे, साबण, चॉकलेट व इतर जीवनावश्यक किराणा माल साहित्य होलसेल भावात विक्रीचा व्यवसाय अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केला होता. माल ठेवण्यासाठी त्यांनी ओझर रस्त्यालगत चार गाळे भाड्याने घेऊन गोडाऊन तयार केले होते. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा मोठा साठा केला होता. पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास यापैकी एका गाळ्याला आग लागली. गाळ्यामधून धुराचे लोट येऊ लागल्याने स्थानिक नागरिक अमोल जगताप यांनी याबाबतची माहिती दिवटे यांना मोबाइलद्वारे दिली. त्यानंतर घटनास्थळी तुषार दिवटे यांच्यासह राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे बाबू पाटे, संतोष दांगट, सोनू डेरे, दादा सुर्वे, विपुल दांगट, अमर पवार, ज्ञानेश्‍वर औटी, गणेश पाटे आदी कार्यकर्ते दाखल झाले. नारायणगाव ग्रामपंचायतीच्या अग्निशामक यंत्रणेच्या साह्याने रसायनयुक्त पाण्याचा फवारा मारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जुन्नर येथील नगरपालिकेचा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. पहाटे पाचच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले; मात्र तोपर्यंत चार गोडाऊनमधील सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

सकाळी नुकसानीचा पंचनामा केला असून, चार गाळ्यांमधील सर्व साहित्य जळून भस्मसात झाले आहे. यामध्ये सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतचा अहवाल नारायणगाव येथील महावितरणला देण्यात आला आहे.
- आर. एन. इलग, ग्राम महसूल अधिकारी, नारायणगाव

वर्षभरातील आगीची दुसरी मोठी घटना
नारायणगाव येथील मुख्य बाजारपेठेतील मुथा मार्केटमधील अष्टविनायक रेडिमेड व वऱ्हाडी मेडिकल या दुकानांना १८ मार्च २०२५ ला पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता. २१) पहाटे मारुती एंटरप्राईजेसच्या गोडाऊनला आग लागली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामधून बोध घेणे आवश्यक आहे.

7511

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com