पाळीव कुत्र्यांनी बिबट्याला पिटाळले
नारायणगाव, ता. ६ : शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा हल्ला जिगरबाज तीन पाळीव कुत्र्यांनी परतवून लावला. ही घटना शनिवारी (ता. ६) पहाटे दीडच्या सुमारास गुंजाळवाडी येथे घडली. एकी हेच बळ असल्याचे अशोक विठ्ठल दरेकर यांच्या काळ्या, ढवळ्या व हल्क या तीन पाळीव कुत्र्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज चित्रित झाले आहेत.
नारायणगाव-गुंजाळवाडी रस्त्यालगत अशोक दरेकर यांचा बंगला आहे. मागील वर्षी त्यांच्या एका पाळीव कुत्र्याचा बिबट्याने फडशा पडला होता. शनिवारी कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने बंगल्याच्या संरक्षण भिंतीवर उडी मारली. बिबट्या भिंतीवर बसलेला असताना तीन पाळीव कुत्र्यांनी बिबट्याच्या दिशेने भुंकण्यास सुरुवात केली. त्यापैकी काळ्या कुत्र्याने प्रति हल्ला करण्यासाठी बिबट्याच्या दिशेने भिंतीवर झेप टाकली. तीन कुत्र्यांचा एकूणच आविर्भाव पाहून बिबट्याने माघार घेतली. भिंतीवरून खाली उतरून बिबट्या दुसऱ्या शिकारीच्या शोधात निघून गेला. त्यानंतर जवळच असलेल्या गुंजाळवाडी येथील वायकर मळ्यातील बाळू बबन वायकर यांची शेळी बिबट्याने फस्त केली. घटनास्थळी दुपारी वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी भेट देऊन पिंजरा लावला. नारायणगाव वनपरिक्षेत्रातील वारूळवाडी नारायणगाव, पिंपळगाव तर्फे नारायणगाव, मांजरवाडी, गुंजाळवाडी, आर्वी, धनगरवाडी, येडगाव, ओझर या बागायती पट्ट्यात बिबटे व बछडे यांची संख्या वाढली आहे. पाळीव जनावरांसाठी असलेले गोठे, कोंबड्यांची खुराडे यांची जाळी तोडून तसेच जाळीच्या खालील माती उकरून बिबटे पशुधन फस्त करत आहेत. वारूळवाडी येथे गुरुवारी (ता. ३) जाळी तोडून बिबट्यांनी गोठ्यात प्रवेश केला. बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार झाल्या. २८ नोव्हेंबरला हिवरे तर्फे नारायणगाव येथील सुशीला यशवंत वाघ यांच्या १३ शेळ्या बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्या.
वारूळवाडी येथील उमेश अवचट, तुकाराम निंबारकर यांच्या चार शेळ्या व राजेंद्र कोल्हे यांची कोंबडी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहे. या सर्व घटना बंदिस्त गोठ्याची जाळी तोडून झाल्या आहेत. यामुळे गोठ्यातील पशुधन सुद्धा आता सुरक्षित राहिले नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी (ता. ४) रात्री साडेआठाच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात नारायणगाव येथील तनिष परदेशी( वय १८) हा विद्यार्थी जखमी झाला. वनविभागाने केलेल्या ड्रोन पाहणीत वारूळवाडी येथील गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर परिसरात असलेल्या उसाच्या शेतात तीन बिबट्यांचे वास्तव्य दिसून आले आहे. नारायणगाव वनपरिक्षेत्रात २५ ते ३० बिबटे असल्याचे रोज होत असलेल्या हल्ल्यावरून स्पष्ट झाले आहे.
बिबट्याला बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी नारायणगाव वनपरिक्षेत्रात १८ पिंजरे लावले आहेत. या व्यतिरिक्त एआय यंत्रणा, ॲनायडर, ड्रोनद्वारे निरीक्षण आदी उपाययोजना केल्या आहेत.
- ज्ञानेश्वर पवार, वनरक्षक
07567
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

