वारूळवाडीत योजना रखडलेलीच

वारूळवाडीत योजना रखडलेलीच

Published on

रवींद्र पाटे : सकाळ वृत्तसेवा
नारायणगाव, ता. १४ : केंद्र शासनाच्या हर घर जल या योजनेअंतर्गत वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत ४७ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते २० मार्च २०२३ला योजनेचे भूमिपूजन झाले होते. नियोजनानुसार ही योजना जुलै २०२५ अखेर पूर्ण करणे ठेकेदाराला बंधनकारक होते. मात्र, निधीअभावी योजना अद्याप पूर्ण झाली नाही. या बाबत ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
पुणे-नाशिक महामार्ग लगत असलेली वारूळवाडी ही जुन्नर तालुक्यातील अग्रेसर ग्रामपंचायत आहे. या भागात मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण सोसायट्या, प्लॉटिंग झाल्याने लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. ग्रामपंचायतच्या वतीने सद्यःस्थितीत माणसी ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पाण्याचे मुख्य स्रोत असलेल्या विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी मार्च नंतर कमी होत असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना शुद्ध व माणसी ५५ लिटर पाणीपुरवठा करता यावा. या उद्देशाने जल जीवन मिशन अंतर्गत ४७ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या योजनेसाठी शासनाने पाइप उपलब्ध करून दिले असून योजनेची उर्वरित २४ कोटी रुपये खर्चाची कामे करण्याचा ठेका नाशिक येथील पी. एल. आडके, साहेबराव गाडे यांनी घेतला आहे. मे २०२३ मध्ये या योजनेचे काम सुरू झाले होते. काम पूर्ण करण्यासाठी ३० महिन्यांची मुदत होती. जुलै २०२५ अखेर हे काम पूर्ण होणे आवश्यक असताना अद्याप हे काम पूर्ण झाले नाही.

योजनेची माहिती पुढील प्रमाणे:
कामासाठी निधी : ४७ कोटी ४८ लाख रुपये
मे २०२३ मध्ये कामाला सुरुवात झाली
काम पूर्ण करण्याचा कालावधी : मार्च २०२३ ते जुलै २०२५

कामाची सद्यःस्थिती
फिल्टर हाऊस, साठवण टाकी, भूमिगत पाइपलाइनची कामे अपूर्ण
येडगाव गाव जलाशयातील विहीर, जॅकवेल व ब्रिजचे काम पूर्ण
वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील वारूळवाडी या मुख्य गावठाणासह परिसरातील १२ वाड्यावस्यांवरील सुमारे तीन किलोमीटर परिघात तीन इंच, चार इंच व्यासाच्या भूमिगत पाइपलाइनची २० टक्के कामे अपूर्ण
पाणी सोडणे बंद करणे यासाठी आवश्यक असणारी वॉल्व्हची कामे अपूर्ण
येडगाव धरण ते ठाकरवाडी दरम्यानच्या पाण्याच्या टाकीला जोडण्यात येणाऱ्या सुमारे अकरा किलोमीटर लांबीच्या मुख्य जलवाहिनीचे कैलास नगर, ओझर रोड,बाजार तळ, डिंभे डावा कालवा आदी रोड क्रॉसिंगची कामे अपूर्ण
ठाकरवाडी येथील सुमारे आठ लाख लिटर क्षमतेच्या मुख्य साठवणटाकीचे, जल शुद्धीकरण प्रकल्प काम प्रगतिपथावर

निधी वापर व आर्थिक स्थिती
मंजूर निधीतून या योजनेसाठी सुमारे २४ कोटी रुपयांचे भूमिगत पाइप शासनाकडून देण्यात आले आहेत. या योजनेच्या फिल्टर प्लांट, साठवण टाक्यांची कामे, भूमिगत खोदाई व पाइपलाइन गाडणे, जॅकवेल, ब्रिज, विहीर, सौरऊर्जा प्रकल्प, विद्युत पंप खरेदी आदींसाठी ठेकेदाराला २४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी ठेकेदाराला १३ कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

२४ पैकी १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ११ कोटी रुपयांचा निधी अद्याप मिळाला नाही. वीस कोटी रुपये खर्चाची कामे आम्ही पूर्ण केली आहेत. योजनेची ८० टक्के कामे पूर्ण झाली असून निधीअभावी २० टक्के कामे प्रलंबित आहेत. निधी उपलब्ध झाल्यास मार्च अखेर शिल्लक कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जागा मिळण्यास उशीर झाल्याने मुख्य साठवण टाकी, जलशुद्धीकरण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रकल्प आदी कामे अपूर्ण आहेत.
- साहेबराव गाडे, ठेकेदार

ठेकेदाराला शासनाने शिल्लक निधी उपलब्ध करून द्यावा. शिल्लक कामे तातडीने पूर्ण करून ही योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात देण्यात यावी.
- विनायक भुजबळ, सरपंच, वारूळवाडी ग्रामपंचायत

शासनाचा प्रतिनिधीच्या देखरेखीखाली योजनेची तांत्रिक कामे करण्यात आली आहेत. योजनेला उशीर झाल्यामुळे काही भागात भूमिगत पाइपलाइन पुन्हा टाकाव्या लागणार आहेत. सर्व कामे पूर्ण झाल्याशिवाय ही योजना ग्रामपंचायतीला ताब्यात घेता येणार नाही.
- सचिन उंडे, ग्रामविकास अधिकारी

7597

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com