गव्हाच्या शेतात बिबट्यांच्या झुंजीचा थरार

गव्हाच्या शेतात बिबट्यांच्या झुंजीचा थरार

Published on

नारायणगाव, ता. २६ : येथील पाटे–खैरे मळा शिवारात शुक्रवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास गव्हाच्या शेतात दोन बिबट्यांमध्ये सुरू असलेल्या झुंजीने शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. साधारणत: एक फूट वाढलेल्या गव्हाच्या पिकात अचानक सुरू झालेल्या या झुंजीमुळे शेतात काम करणारे मजूर भयभीत झाले होते. बिबट्यांच्या गुरगुरणाऱ्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शुक्रवारी दुपारी दोन वाजता पिंजरा लावण्यात आला आहे, अशी माहिती वनरक्षक ज्ञानेश्‍वर पवार, आपाद मित्र सुशांत भुजबळ यांनी दिली.
नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पाटे- खैरे मळा शिवारातील धोंडिभाऊ खैरे यांच्या साधारणपणे एक फूट वाढलेल्या गव्हाच्या शेतात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास बिबट्यांची झुंज सुरू होती. बिबट्यांच्या आवाजामुळे परिसर दणाणून गेला. येथील नामदेव खैरे यांच्या जर्मन शेफर्ड पाळीव कुत्र्याने बिबट्यांच्या दिशेने धाव घेतली. प्रसंगावधान राखून उपस्थित शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यानंतर दोन्ही बिबटे दोन दिशेने जवळच्या उसाच्या शेतात निघून गेले. मात्र, या घटनेमुळे शेतात वस्ती करून राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, नारायणगाव वनपरिक्षेत्रातील आर्वी, गुंजाळवाडी, वारूळवाडी, मांजरवाडी, हिवरे तर्फे नारायणगाव परिसरात बिबट्यांचे दर्शन नित्याचे झाले आहे. दोन ते तीनच्या संख्येने बिबटे फिरताना दिसत आहेत. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी १८ ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी बिबटे मानवी वस्तीत भक्ष्याच्या शोधात फिरत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर रोज व्हायरल होत आहेत. या भागात अनेक पाळीव कुत्रे, शेळ्या, मेंढ्या, वासरे आदी पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहेत. वारूळवाडी येथे शेतात काम करीत असणारी महिला, खडकवाडी येथील मेंढपाळ, नारायणगाव येथील तरुण बिबट हल्ल्यात जखमी झाला आहे. बिबट नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून शासनाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांच्या नाराजीचा सामना वन कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

बिबट्यांचा वावर रात्रीबरोबरच दिवसासुद्धा शेतात वाढला आहे. शेतातील ससे, कोल्हे, मुंगूस आदी वन्यप्राणी नष्ट झाल्याने भक्ष्याच्या शोधात बिबटे चवताळलेले आहेत. पाळीव जनावरे व मानवावर बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. पिंजरे लावून बिबट्यांचे नियंत्रण होत नाही. बिबट समस्येचे गांभीर्य शासनाने लक्षात घ्यावे.
- नामदेव खैरे, शेतकरी

7649, 7650

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com