
‘राजगड’च्या हद्दीत चोऱ्यांनी गाठली शंभरी वर्षभरात एकूण ४६७ गुन्ह्यांची नोंद; अपघातातील मृत्यू ६५ तर ९४ जखमी
नसरापूर, ता. ३ : राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात एकूण ४६७ गुन्ह्यांची नोंद झाली असून, चोरी, जबरी चोरी, दरोडा व घरफोडी यामध्ये शतक पार होऊन १११ घटनांची नोंद झाली आहे. तर वर्षभरात अपघातात ६५ जणांचे प्राण गेले आहेत व ९४ जण जखमी झाले आहेत.
या पोलिस ठाण्याच्या हद्दीत भोर व हवेली तालुक्यातील मिळून ८१ गावे असून, या अंतर्गत नसरापूर, किकवी, शिवापूर व शिंदेवाडी या चार चौक्या आहेत. पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्यासह ४७ कर्मचारी येथे कार्यरत आहेत. शहराला लागून असलेला बराचसा भाग तसेच पुणे-सातारा महामार्गाचा सुमारे २० ते २२ किलोमीटरचा भाग या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने येथे गुन्ह्यांची संख्या नेहमीच जास्त असते. त्याचप्रमाणे महामार्गावरून जाणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेचा विचार करता, येथील पोलिसांची कायमच धावपळ असते. यासाठी पुरेसा वाढीव कर्मचारी वर्ग येथे असणे गरजेचे आहे.
पोलिस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज नवसरे, नितीन खामगळ, फौजदार संजय सुतनासे, निखिल मगदूम, श्रीकांत जोशी या अधिकाऱ्यांसमवेत सर्व पोलिस कर्मचारी सतर्क राहून पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर वचक ठेवून आहेत.