खोटे जन्म प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी ग्रामसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोटे जन्म प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी 
ग्रामसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा
खोटे जन्म प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी ग्रामसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा

खोटे जन्म प्रमाणपत्र बनवल्याप्रकरणी ग्रामसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा

sakal_logo
By

नसरापूर, ता. ७ : महिलेचे बनावट जन्मप्रमाणपत्र बनवून न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यामध्ये सादर करून प्रतिपक्ष व न्यायालयाची फसवणूक केल्याप्रकरणी भोर न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सात जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून तपास अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश राजगड पोलिसांना दिले आहेत.

या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात सूर्यकांत ज्ञानोबा कुंजीर (वय ५४, रा. कुंजीरवाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमन ज्ञानोबा शिंदे (वय ५५), बाळासो ज्ञानोबा शिंदे (वय ४२), सचिन ज्ञानोबा शिंदे (वय ३३), सुजाता संभाजी कटके (वय ३९), निखिल गुलाब कुंजीर (वय ३०, पाचही जण रा. कुंजीरवाडी, ता. हवेली), किरण आनंदा भंडलकर (वय ३६, रा. मांडकी, ता. पुरंदर) व भोंगवली ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक जे. एस. बिराजदार या सातजणांविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत भोंगवली (ता. भोर) येथे १८ ऑगष्ट २०२२ पूर्वी ही घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सातही आरोपींनी आरोपी क्रमांक एक सुमन ज्ञानोबा शिंदे यांची जन्माची खोटी नोंद जन्म दाखल्याच्या नोंदवहीत करून जन्माचे खोटे व बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर जन्माच्या प्रमाणपत्रामध्ये वडिलांचे पूर्ण नाव तसेच आईचे नाव समाविष्ट केले. तसेच त्यांचा राहण्याचा व कायमचा पत्ता बदलून खोटे व बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करून ते न्यायालयात दाखल करून फिर्यादी व न्यायालयाची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी सूर्यकांत कुंजीर यांनी ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर भोर न्यायालयाने या बाबत भोंगवली येथील ग्रामसेवकासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश राजगड पोलिसांनी दिले आहेत.