
नसरापूर ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा
नसरापूर, ता.९. : नसरापूर ग्रामपंचायतीची २६ जानेवारी रोजी तहकूब झालेली ग्रामसभा गुरुवारी (ता.८) घेण्यात आली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होत महिलांसाठी स्वच्छतागृह, तसेच स्वप्नलोक सोसायटीपासून लेंडीओढ्यावर नव्याने गटार बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच रोहिणी शेटे उपस्थित होत्या यावेळी उपसरपंच संदीप कदम,सदस्य नामदेव चव्हाण,सदस्या सपना झोरे,अश्विनी कांबळे,ग्रामसेवक विजय कुलकर्णी व नसरापूर येथील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते
ग्रामसभेत नसरापूरच्या वार्षिक आर्थिक जमा खर्चाचे वाचन ग्रामसेवकांनी केले यानंतर नसरापूरसाठी जलजीवन अंतर्गत नव्याने होत असलेल्या पाणी योजनेची माहिती देऊन या योजनेंतर्गत होत असलेल्या कामांची माहिती कामाचे ठेकेदार यांनी दिली. येथील इंदिरा गृहरचना सोसायटीचे सांडपाणी सार्वजनिक गटारात जात नाही या ठिकाणी गटाराचे काम होणे होण्याबाबत सोसायटीच्या रहिवाशांनी अर्ज दिला होता व सोसायटीचे सदस्य यावेळी सभेस उपस्थित होते. त्यांना माहिती देताना स्वप्नलोक गेट ते लेंडीओढ्यापर्यंत पूर्वीचे जे गटार आहे तेच गटार नव्याने बांधण्यात येऊन इंदिरा सोसायटीच्या सांडपाण्याचा प्रश्न मार्च अखेरपर्यंत सोडवला जाईल असा निर्णय घेण्यात.
गावच्या कचरा प्रकल्पासाठी चेलाडी फाट्याजवळील एस टी महामंडळाच्या ताब्यातील दहा गुंठे जागा मागणी करण्याचा निर्णय घेण्यात येऊन तसा प्रस्ताव पाठवण्याचे ठरवण्यात आले तसेच गावच्या मेनआळी भागात ग्रामपंचायत जागेत महिलांसाठी स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण झाल्याबाबत ग्रामपंचायतीकडून कारवाई होत नाही याबाबत काही ग्रामस्थांनी अक्षेप नोंदवल्यावर याबाबत पुन्हा माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवकांनी दिली.
सभेत उपसरपंच संदीप कदम यांनी आभार मानले.
03118