
बसमधील प्रवाशाचे २२ लाख रुपये लंपास
नसरापूर, ता. १४ : सोने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचा कामगार मुंबई येथून मेंगलोर (कर्नाटक) येथे जाण्यासाठी खासगी आरामबसने प्रवास करत असताना त्याच्या बॅगमधील रोख २२ लाख रुपये बस हॉटेलवर चहानाष्ट्यासाठी थांबली असताना चोरीस गेली. याबाबत राजेंद्र प्रकाश पवार (वय ३८, रा. मेंगलोर, कर्नाटक) या सोन्याच्या व्यापाऱ्याने बस साफ करणारा मुलगा व बसचे दोन चालक यांच्यावर संशय व्यक्त करत राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
राजेंद्र पवार यांचा जुने सोने लिलावात खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे कामास असलेला कामगार स्वरूपसिंग (वय ३२, रा. राजस्थान) यास २२ लाख रुपये देऊन त्यांनी मुंबई येथे सराफी व्यवसायिकांच्या जुन्या सोन्याचा लिलावात भाग घेण्यासाठी १ फेब्रुवारी रोजी पाठवले होते. मात्र, पाच ते सहा दिवस लिलाव न झाल्याने ७ फेब्रुवारी रोजी स्वरूपसिंग त्याच्या जवळचे २२ लाख रुपये घेऊन पुन्हा मेंगलोर येथे येण्यासाठी कॅनरा पिंटो या खासगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसने (क्र. के.ए. १९ ए.डी. ०९६६) निघाला होता. दुपारी साडेचार वाजता निघालेली बस रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-बंगळूर महामार्गावर सारोळा (ता. भोर) येथील ‘हॉटेल अमृता’ येथे चहा-नाश्त्यासाठी थांबली. त्यावेळी स्वरूपसिंग पैशाची बॅग सिट खाली व्यवस्थित ठेऊन खाली उतरला व परत बसमध्ये बसला असता सिटखाली ठेवलेली बॅग व्यवस्थित होती, मात्र बॅगमधील २२ लाख रुपये गायब झाले होते. याबाबत त्याने बस चालक व स्वच्छता कामगार याकडे चौकशी केली. परंतु, त्यांनी, ‘आम्ही तुलाच पोलिसांकडे देतो,’ असे सांगून बस थांबवण्यास नकार दिला. त्यानंतर स्वरूपसिंग याने मालक पवार यांना फोन करून माहिती दिली. पवार यांनी राजगड पोलिस ठाण्यात येऊन याबाबत तक्रार दिली.