
नसरापूर येथे शिवरायांच्या नामाचा जयघोष
नसरापूर, ता.३ : नसरापूर (ता. भोर) येथे शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे शिवपुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.या वेळी दुतर्फा भगवे ध्वज, ढोल ताशांचा दणदणाट व फटाके वाजवत शिवरायांच्या नामाचा जयघोष करण्यात आला.
मिरवणुकीत भगवा शेला परिधान करून महिला व नागरिक सहभागी झाले होते. पुतळ्यासाठी मिरवणूक रथावर आकर्षक रोषणाई केली होती. मिरवणुकीत अनेक नागरिकांनी सहभागी होत शिवपुतळ्यावर पुष्पवृष्टी केली. सायंकाळी सात वाजता विठ्ठल मंदिर येथे मिरवणूक आल्यावर मंदिर सभागृहात शिवचरित्रकार विजय खुटवड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
व्याख्यानात खुटवड यांनी शिवछत्रपतींच्या जीवनातील प्रसंग सांगताना शिवछत्रपतींनी आपले स्वत:चे स्वराज्य उभे केले कोणाकडून ओरबाडून घेतले नाही कि, त्यासाठी वडिलांची, भावाची हत्या केली नाही. स्वराज्याभिषेक करून घेताना प्रत्येक पायरीवर या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडलेल्या मावळ्यांची आठवण काढत सिहांसनावर आरूढ झाले. जनतेसाठी या दिवशीच स्वराज्याचे स्वतंत्र चलन मुद्रा सुरू करण्यात आली. मुद्रेवर देखील हे रयतेसाठीचे स्वराज्य असल्याचे नमूद करून या जाणता राजाने रयतेसाठी राज्य केले.
कार्यक्रमास खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी भेट दिली. पुण्याचे माजी नगरसेवक अशोक ऐनपुरे, नसरापूरचे माजी सरपंच अनिल गयावळ, प्रकाश चाळेकर, भरत शेटे, रोहिणी शेटे, वैशाली झोरे, संतोष कदम, अजय पुरंदरे, सुधीर शिळीमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सोहळा समितीचे अनिल शेटे, विजय जंगम, किरण भदे, किरण शिनगारे, राजू मिठाले, देवेंद्र फडके, प्रसाद वाफगावकर, अविनाश गयावळ, अनंता मोरे, सुशील विभूते, रवींद्र शेडगे, संजय वाल्हेकर व सर्परक्षक, वन्य प्राणी रक्षक संघटनेचे कार्यकर्ते यांनी नियोजनात सहभाग घेतला.
03347