भोरमधील महायुतीच्या नेत्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ

भोरमधील महायुतीच्या नेत्यांवर आत्मपरीक्षणाची वेळ

किरण भदे : सकाळ वृत्तसेवा
नसरापूर, ता. ६ : बारामती लोकसभा मतदार संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत भोर तालुक्यात बुहतेक सर्वच गावांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मताधिक्य घेतले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) तालुक्यातील मातब्बर नेत्यांची फौज प्रचारात असूनही त्यांना जनमत खेचता आले नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस व आमदार संग्राम थोपटे यांच्याबरोबर शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पूर्ण बळ लावल्याने तालुक्यात सुळे यांना चांगली आघाडी मिळाली. अजित पवार यांच्याकडे तालुक्यातील आजी- माजी पदाधिकारी व मातब्बर नेते प्रचारात होते. या नेत्यांचा संपर्क तालुक्यात चांगला आहे, मात्र हा संपर्क मतपेटीत का उतरू शकला नाही, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ या नेत्यांवर आली आहे.
भोर तालुक्यातील काही निवडक मतदान केंद्र वगळता सर्वच मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे यांनी शंभर, दोनशे; तर कधी दुप्पट मताधिक्य घेतले. सुळे यांच्याकडे पक्षाची ताकद नगण्य होती. त्यात आघाडीमधील शिवसेनेचे (ठाकरे) नेते कुलदीप कोंडे यांनी देखिल अचानक शिंदे गटात प्रवेश केल्याने तालुक्यातील ताकद कमी झाली होती. मात्र, अशा वेळी आमदार थोपटे व काँग्रेसची ताकद भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिल्याचे दिसते.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या उत्रौली गावात सुनेत्रा पवार यांना ९८४ मते; तर सुळे यांना ७०२ मते मिळाली. या ठिकाणी २८२ मतांचे लिड पवार यांना मिळाले. या प्रमाणेच कुलदीप कोंडे यांच्या केळवडे गावात पवार यांना ९१९; तर सुळे यांना ६८४ मते मिळून पवार यांना २३५ मतांचे मताधिक्य मिळाले आहे. या दोन नेत्यांची गावे वगळल्यास अजित पवार यांच्या पक्षातील जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या न्हावी क्र.३२२ व १५ मध्ये पवार यांना ४३५; तर सुळे यांना ८२१ मते मिळून सुळे यांना ३८६ मतांचे मताधिक्य मिळाले. विक्रम खुटवड यांच्या हातवे खुर्दमध्ये पवार यांना २२६; तर सुळे यांना ३३६ मते मिळाली आहेत. हातवे बुद्रुकमध्ये पवार यांना ४२१; तर सुळे ७३९ मते मिळाली. चंद्रकांत बाठे यांच्या केंजळ गावात पवार यांना ३९२; तर सुळे यांना ६२१ मते मिळाली.
अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश केलेले भोर शहरातील यशवंत डाळ यांना प्रभाव टाकता आला नसल्याचे दिसते. भोर शहरात सुनेत्रा पवार यांना ३६९६; तर सुळे यांना ५०३६ मते आहेत. येथे सुळे यंनी १३४० मतांची आघाडी मिळाली आहे.
या उलट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या गावात सुळे यांना मताधिक्य मिळवण्यात यश मिळवले आहे. आमदार थोपटे यांच्या हातनोशी गावात पवार यांना फक्त ४९; तर सुळे यांना ४३४ मते मिळाली. शिवसेनेचे (ठाकरे) तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांच्या शिंदेवाडी गावात सुनेत्रा पवार यांना ४१२; तर सुळे यांना ६९८ मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल यांच्या महुडे बुद्रुक येथे पवार यांना १८७; तर सुळे यांना ८१३ मते मिळाली. सुळे यांचे प्रचारप्रमुख मानसिंग धुमाळ यांच्या पसुरे गावाच पवार यांना १३६; तर सुळे यांना ३२० मते मिळाली. गणेश खुटवड यांच्या उंबरे येथे पवार यांना १५६; तर सुळे यांना ४९५ मते मिळाली आहेत.
वेळू येथे पवार यांना ६१९; तर सुळे यांना १२३७, शिवरे येथे पवार यांना २००; तर सुळे यांना ८६५, कुरुंगवडी येथे पवार यांना २४७; तर सुळे यांना ४३२, नसरापूर येथे पवार यांना ६२६; तर सुळे यांना ९६९, भोंगवली येथे पवार यांना ५५७; तर सुळे यांना ९७८ मते मिळाली आहेत. बहुतेक सर्वच गावात सुळे यांनी मताधिक्य घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com