कर्तव्यात कसूरप्रकरणी 
न्हावीचे सरपंच अपात्र

कर्तव्यात कसूरप्रकरणी न्हावीचे सरपंच अपात्र

नसरापूर, ता. २ : कर्तव्यात कसूर करून सरपंचपदाचा गैरवापर केल्याबाबत न्हावी ३२२ (ता. भोर) ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच गणेश ज्ञानोबा सोनवणे यांना त्यांच्या सदस्यपदासह अपात्र ठरविण्याचे आदेश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
याप्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ अजय रूपचंद कांबळे यांनी सरपंच सोनवणे यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रार अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये सन २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी गणेश ज्ञानोबा सोनवणे हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले व त्यांनी बहु‌मताने ग्रामपंचायत सरपंच म्हणून पदभार स्वीकारल्यावर सरपंचपदाच्या कर्तव्यात कसूर करत १५वा वित्त आयोगाचा निधी हा ग्रामसभेची मंजुरी न घेता परस्पर खर्च करणे, मासिक सभा न घेणे, मनमानी कारभार करणे, ग्रामपंचायतीमधील रजिस्टरमध्ये खाडाखोड करणे, शासकीय प्लॉट परस्पर विक्री करणे, बनावट ८ अ उतारे व मृत्यू दाखले तयार करणे, ग्रामपंचायत कामांमध्ये भ्रष्टाचार करणे, असे आरोप केले होते. या तक्रारींबाबत पुरंदरचे गटविकास अधिकारी यांच्यामार्फत प्राथमिक चौकशी केली. त्यांनतर अनेक चौकशी अहवाल सादर झाल्यानंतर पुणे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी निर्णय घेत, कर्तव्य पालनात हयगय, हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गणेश सोनवणे हे सध्या जरी ग्रामपंचायतीचे सरपंचपदावर कार्यरत नसले, तरी त्यांना ग्रामपंचायतीचे सदस्यपदावर कार्यरत ठेवणे उचित नसल्याने सार्वत्रिक निवडणूक २०२१चे उर्वरित कालावधीसाठी त्यांना पदावरून काढण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बळिराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश गणगे, प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष संतोष मोहिते, गणपत पारठे, संतोष पारठे, मिलिंद तारू, जगन्नाथ सपकाळ, विजय गायकवाड, लव्हाजी मालुसरे, रामचंद्र कोंढाळकर, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com