खोट्या कागदपत्रांव्दारे कोविड विमाकवचचा लाभ

खोट्या कागदपत्रांव्दारे कोविड विमाकवचचा लाभ

Published on

नसरापूर, ता.८ : शिंदेवाडी (ता.भोर) ग्रामपंचायतीचे कोविड काळातील तत्कालीन दिवंगत शिपाई यांना मृत्यूपाश्चात देण्यात आलेले कोविड १९ विमा कवच ते पात्र नसताना देखील तत्कालीन ग्रामसेवकाने आपल्या पदाचा गैरवापर केला व संबंधित कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला. याबाबत खंडू सुरेश वाडकर यांनी तक्रार करण्यात आली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

भोर तालुका गटविकास अधिकारी यांच्यापासून राज्याच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्यापर्यंत वाडकर यांनी तक्रार केली आहे. त्यामध्ये शिंदेवाडी ग्रामपंचायतीचे तत्कालीन दिवंगत शिपाई रमेश महादेव गोळे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे त्यांच्या नोकरीचा कार्यकाल वाढवला असून, या दरम्यान कोरोनाने मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना तत्कालीन ग्रामसेवकाने पदाचा गैरवापर करत ५० लाख रुपयांचा लाभ मिळवून दिला असल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, वाडकर यांनी सांगितले कि, रमेश महादेव गोळे यांच्या सेवा पुस्तीकेवरील नियुक्ती दिनांक व प्रत्यक्ष नियुक्ती दिनांक हा वेगळा असून, संबंधित अधिकारी ग्रामसेवक यांनी सेवा पुस्तिकेमध्ये फेरफार केल्याचे दिसते आहे त्याच प्रमाणे गोळे यांच्याकडून त्यांच्या वयाच्या वर्षाबाबत दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर केली होती तसेच त्यांच्या शैक्षणिक अहर्तेचे कोणतेही कागदपत्र ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत नाही. कोविड विमा कवच प्रस्तावामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांचे पॅनकार्ड कोठेही दिसून येत नाही. सेवा पुस्तिकेमध्ये गोळे यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झाल्याचे म्हटले आहे. परंतु शाळेचा दाखला कोठेही पहावयास मिळत नाही. तो जाणीवपूर्वक लपवून प्रस्तावाबरोबर दिशाभूल करणारा वयाचा पुरावा शासनास सादर केल्याचे दिसते. अर्जासोबत जोडलेल्या संपूर्ण कुटुंबाच्या वयोमानाचा तक्ता पाहिला असता गोळे यांच्या पहिल्या मुलीचा जन्म १९८० मध्ये झाल्याचे दिसते. या मुलीच्या जन्मावेळी गोळे यांचे खोट्या जन्मतारखेनुसार वय १७ वर्ष येत आहे व खऱ्या जन्मतारखेनुसार वय २२ वर्षे दिसते आहे. या सर्व बाबींचा विचार केला असता रमेश गोळे हे ग्रामपंचायत सेवेमधून सन २०१८ रोजी निवृत्त होणे आवश्यक असताना खोट्या कागदपत्रांच्या आधारे कार्यकाल वाढवून त्याकाळात कोरोनाने मृत्यू झाल्यावर कोविड -१९ विमा कवचाचा लाभ त्यांच्या कुटुंबीयांना दिल्याचे दिसत आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येऊन तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, संबंधित कुटुंब यांच्यावर शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वाडकर यांनी केली आहे.

चौकशीसाठी विस्तार अधिकाऱ्याची नियुक्ती
कोविड विमाकवचप्रकरणी केलेल्या मागणी अर्जावर महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग कक्ष अधिकारी यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून, या संदर्भात विभागीय चौकशी करून कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी भोर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना चौकशीच्या सूचना दिल्या आहेत तर गटविकास अधिकारी यांनी याबाबत चौकशी साठी विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

शिपाई रमेश महादेव गोळे प्रकरणी चौकशीसाठी विस्तार अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. कोविड विमा कवचाचा लाभाबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- किरणकुमार धनवाडे, गटविकास अधिकारी

वडिलांचा कोरोना काळात कामावर असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे शासनाने त्यांना नियमानुसार विमा कवच दिले. यासाठी सर्व सत्य कागदपत्र आम्ही सादर केले आहेत. कोणताही गैरप्रकार नाही. तक्रारदार खंडू वाडकर हे आमचे जवळचे नातेवाईक असून, शिंदेवाडी येथील एका जागेवरून त्यांच्या व आमच्यातील वाद कोर्टात सुरू आहे. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास देत आहेत.
- जालिंदर गोळे, दिवंगत कर्मचारी रमेश गोळे यांचे चिरंजीव

शिंदेवाडी ग्रामपंचायत कर्मचारी रमेश गोळे यांचा कोरोना काळात मृत्यू झाला. या नंतर शासनाच्या नियमानुसार सर्व कागदपत्रे पडताळणी करून विमा कवच मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता व तो शासनाकडून मंजूर झाला आहे. यात कोणतेही गैर काम करण्यात आलेले नाही.
- दीपक सुरवसे, तत्कालीन ग्रामसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.