शिवरेतील शासकीय जमिनीवर अतिक्रमण
नसरापूर, ता. १ : शिवरे (ता. भोर) येथे मागासवर्गीयांच्या घरासाठी शासकीय घरकुलासाठी दान केलेली दहा गुंठे जागा त्यांच्याच वारसांनी तेथे राहत असलेल्या नागरिकांना बेघर करत जागेचा ताबा घेतला. याबाबत प्रशासन अनभिज्ञ असून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप दिगंबर पवार यांनी केला आहे. त्यांनी शासनाकडे माहिती अधिकाराअंतर्गत मागविलेली माहितीदेखील प्राप्त झालेली नाही.
मागासवर्गीय शेतमजूर कुटुंबीयांच्या घरासाठी बबन बाळकू पवार यांनी १९८३ साली सामाजिक हेतूने गट क्र. ४५/१ या क्षेत्रातील दहा गुंठे जागा नसरापूरचे मंडल अधिकारी आणि भोर तहसीलदार यांच्या उपस्थितीत जबाब देऊन शासनाच्या नावे केली. याबाबत ८ आक्टोबर १९८३ मध्ये नोंद घेऊन फेरफार क्रमांक ४७२ वर १० गुंठे जागा शासकीय नावे करून तसा सातबारा उतारा तयार केला आहे.
दिगंबर पवार यांनी सांगितले की, या जागेवर शासनाची नोंद होण्यापूर्वी व झाल्यानंतर तेथे १० ते १५ मागासवर्गीय शेतमजूर कुटुंबीय राहात होते. मात्र, जागा दान केल्यानंतर काही वर्षांनंतर बबन पवार यांच्या वारसांनी या दहा गुंठे जागेवर हक्क सांगत तेथे राहणाऱ्या मागासवर्गीय कुटुंबांना तेथून हुसकावून लावून तेथे घराचे बांधकाम केले. याबाबत पवार यांनी बेघर कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी भोर तहसील कचेरी, पंचायत समिती कार्यालयाकडे पत्र व्यवहार करत जागा व घरकुलासंदर्भात माहिती मागवली. मात्र, प्रशासनाकडून त्यांना ती अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र, शिवरे गावाच्या सातबारा उताऱ्यावर गट क्र. ४५/१ मधील खाते क्र. २७७ मध्ये शासकीय घरकुले म्हणून १० गुंठे जागेची नोंद आहे. या जागेबाबत शासनाने कारवाई करून ती ताब्यात घेऊन शेतमजूर कुटुंबीयांना परत करण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांच्याशी संपर्क साधला असता, या जागेसंदर्भात माहिती घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया देण्यात आली.
आमच्यावर अतिक्रमण केल्याचा आरोप होत असलेली जागा आजही पूर्ण रिकामी आहे. आमच्या वडिलांनी सामाजिक हेतूने शेतमजुरांच्या घरकुलासाठी ती दिली होती. कालांतराने मजुरांनी ती जागा आम्हाला परत दिली. परंतु, सातबाऱ्यावर ‘शासकीय घरकुल’ अशी नोंद असल्याने आमच्याकडून त्यावर कोणतेही बांधकाम केलेले नाही. याबाबत चौकशी करून त्यात आम्ही दोषी आढळल्यास क्र. ४६ गटातील आमच्या मालकीची दुप्पट जागा आम्ही शासनास देण्यास तयार आहोत. ही १० गुंठे जागा ज्यांच्यासाठी दिली ते वापरण्यास तयार नसतील, तर शासनाने मुळमालक म्हणून आम्हास परत द्यावी, अन्यथा तिथे कोणताही शासकीय उपक्रम राबवून आमच्या आजोबांचे नाव द्यावे, अशी आमची भूमिका आहे.
- राजेंद्र पवार, जागा दान करणारे बबन पवार यांचे वारस