शिवकालीन अमृतेश्‍वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

शिवकालीन अमृतेश्‍वर मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान

Published on

किरण भदे, नसरापूर
नसरापूर, ता. १० : मोहरी बुद्रुक (ता. भोर) येथील प्राचीन हेमाडपंथी शैलीतील अमृतेश्‍वर शिवमंदिर हे शिवकालीन असून छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ आणि विश्‍वासू सहकारी हैबतराव शिळीमकर यांचे हे आराध्य दैवत आहेत. हे देवस्थान गुंजन मावळातील शिळीमकरांसह भाविकांचे श्रद्धास्थान आहे. अमृतेश्वराच्या पौरोहित्याची जबाबदारी वंशपरंपरेने शिवकाळापासून सांभाळणारे राजगुरू (गुरव) हे येथील पुजारी तर गुंजनमावळातील शिळीमकर येथील उत्सवाचे प्रमुख मानकरी आहेत.
मुरुंबखोरे म्हणजेच गुंजनमावळ या भागातील ८४ गावच्या वतनाचे संरक्षण हैबतराव शिळीमकर मुरुंबदेव व तोरणा गडाच्या सहाय्याने करत असताना राजमाता जिजाऊ साहेबांनी हैबतरावांना शिवापूर येथे बोलावून बालशिवबांची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. ती स्वीकारून हैबतरावांनी शिवबांना घेऊन मोहरी येथील अमृतेश्‍वर मंदिरात अखेरच्या श्‍वासापर्यंत शिवबांचे रक्षण करण्याची शपथ घेतली आणि ती आखेरपर्यंत पार पाडली. आशा शिवकालीन अमृतेश्‍वर मंदिराचे महात्म्य मोठे आहे. या ठिकाणी शिवाजीराजांनी अनेकवेळा भेट दिल्याचे तसेच या मंदिरात न्यायदानाचे काम झाल्याचे पुरावे इतिहासात आहेत.
अमृतेश्‍वर मंदिर शिल्पसौंदर्य अप्रतिम आहे. दगडी बांधकामातील मंदिरावर शक्तीचे प्रतीक असलेले गंडभेरुड, वाघ, हत्ती, गाय, बैल, कमळ अशी शिल्प कोरलेली आहेत. मंदिराचा चोहोबाजूने दगडी तटबंदी असून पूर्वेकडे प्रवेशद्वार असून मध्यभागी मंदिर आहे. मंदिराचे शिखर अतिशय कलात्मक आहे. मंदिराच्या सभामंडपात विशाल नंदी, चार नक्षीदार दगडी स्तंभाचा नंदी मंडप आहे. कलात्मक घडीव दगडी मंदिराचे कीर्तीमुख लक्ष वेधून घेते. शंभू महादेवांचे खोलगट गर्भगृहात पूर्वाभिमुख आणि उत्तरेकडे पन्हाळी असलेले प्राचीन शिवलिंग आहे. त्या खालून वाहणारा पाण्याचा प्रवाह मंदिराच्या उत्तरेस कलात्मकरित्या बांधलेल्या दगडी कुंडात येतो. या कुंडात वर्षभर पाणी असते.
श्रावणात संपूर्ण महिनाभर मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परिसरातील भजनी मंडळे येऊन भजने म्हणतात, पहाटेपासून अभिषेक, नित्यपूजेनंतर दिवसभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. ग्रामस्थ तसेच देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांना प्रसाद वाटण्यात येतो.

Marathi News Esakal
www.esakal.com