महामार्गावर फ्लेक्स लावून विद्रूपीकरण; दोघांवर गुन्हा
खेड शिवापूर, ता. ९ : पुणे-सातारा महामार्गावर कोंढणपूर फाटा येथे उड्डाणपुलाच्या भिंतींना फ्लेक्स लावून विद्रूपीकरण केल्याबद्दल राजगड पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास कांबळे (रा. रांझे, ता. भोर), ओंकार प्रल्हाद कोंडे (रा. शिवापूर, ता.हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर पीएस टोलरोड कंपनीचे रोड व्यवस्थापक अभिजित गायकवाड (वय ३४) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्यवस्थापक गायकवाड व सहकारी महामार्गावर शिंदेवाडी ते सारोळा असे पेट्रोलिंग करत असताना महामार्गावर श्रीरामनगर गावाच्या हद्दीत कोंढणपूर फाटा येथील उड्डाणपुलाच्या भिंतींना फ्लेक्स लावल्याचे निदर्शनास आले. हे फ्लेक्स कोणी लावले याबाबत माहिती घेतली असता हे फ्लेक्स कांबळे व कोंडे यांनी परवानगी न घेता अनधिकृतपणे लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलिस हवालदार गायकवाड करत आहेत.

