फटाक्याने भाजलेल्या मुलांवर यशस्वी उपचार
नसरापूर, ता. १४ : येथील स्वामीसमर्थनगर येथे फटाके वाजवताना गंभीर जखमी झालेल्या दोन गरीब कुटुंबामधली मुलांवर येथील विविध सामाजिक, दानशूर नागरिकांनी आर्थिक मदतीसाठी हात पुढे करत येथील सूर्यवंशी हॉस्पिटलचे डॉ. विराज सूर्यवंशी यांच्या सहकार्याने यशस्वी उपचार केले.
नसरापूर (ता. भोर) येथील संस्कार प्रदीप झेंडे (वय ११), साई तुषार गाडेकर (वय १२) हो दोघे फटाके वाजवत असताना फटाक्यांच्या स्फोटाने गंभीर भाजले होते त्यांना कुटुंबीयांनी उपचारासाठी पुणे येथे नेले; परंतु तेथील उपचाराचा येणारा मोठा खर्च पेलवणार नसल्याने त्यांनी मुलांना घरी आणले व घरगुती उपचार सुरू केले. यावेळी त्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी पुढाकार घेत याबाबत मदत करण्याचा निर्णय घेऊन मुलांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्याची तयारी केली. या दरम्यान मुलांच्या कुटुंबीयांनी नसरापूर येथील सूर्यवंशी हॉस्पिटलमध्ये मुलांना दाखवण्यासाठी नेले असता तेथील डॉ. विराज सूर्यवंशी यांनी सर्व परिस्थिती व नागरिकांनी घेतलेला पुढाकार पाहून त्यांनी अल्पदरात उपचार करण्याची तयारी दाखवली. दोन्ही मुलांना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतले. मुलांच्या उपचारासाठी परिसरातील नागरिकांनी सोशल मीडियावर आवाहन करत एक क्युआर कोड जाहीर करून उपचारासाठी मदतीने आवाहन केले. डॉ. सूर्यवंशी हॉस्पिटलचा क्युआर कोड देखील जाहीर करण्यात आला. यादोन्ही कोडवर समाजातील दानशूरांसह या दोन्ही मुलांच्या शालेय मित्रांनी देखिल आपले खाऊचे पैसे देऊन उपचारासाठी मदत केली. या मदती नंतर मुलांवर चांगले उपचार झाले असून त्यांच्या आई-वडिलांनी समाजामधून उभ्या राहिलेल्या या मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.
दोन्ही मुले अत्यंत गंभीर जखमी झाली होती आम्ही व हॉस्पिटलच्या सर्व सहकार्यांनी हे उपचाराचे आव्हान स्वीकारत अक्षरशः दिवसरात्र या मुलांवर लक्षकेंद्रीत करत उपचार केले. आता मुलांची प्रकृती चांगली सुधारली असून व्यवस्थित झालेल्या उपचाराने त्यांना नवीन त्वचारोपण करण्याची गरज नाही. यशस्वी उपचारानंतर बुधवारी (ता. १२) दोन्ही मुलांना घरी पाठवण्यात आले आहे हीच आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
- डॉ.विराज सूर्यवंशी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

