सातारा महामार्गावर काहीप्रमाणात कोंडीला ‘ब्रेक’

सातारा महामार्गावर काहीप्रमाणात कोंडीला ‘ब्रेक’

Published on

नसरापूर, ता. १३ : पावसाळ्यात दुरवस्था झालेल्या पुणे-सातारा महामार्गाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्या मार्गदर्शनाखाली एम. डी. इन्फ्रा कंपनीतर्फे मुख्य रस्त्याचे डांबरीकरण तसेच सेवा रस्त्याचे डांबरीकरण व विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामामुळे पुणे-सातारा मार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळून या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची मोठी सोय झाली आहे. मात्र, अर्धवट कामे देखील तातडीने पूर्ण करण्याची गरज असून त्यामुळे सुट्ट्यांच्या दिवशी होणाऱ्या वाहतूक कोंडीमधून दिलासा मिळेल.
पूर्वी दोन मार्गिकांचा असलेला खेड शिवापूर ते रावेत सेवा रस्ता आता ३.५ मीटरने वाढवून एकूण १०.५ मीटर करण्यात आला आहे. तर शिवापूर ते सारोळा या अंतरातील सेवा रस्त्यावरील ज्या ठिकाणी ताब्याबाबत वाद आहे असा भाग सोडून सर्व सेवा रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. वाढलेल्या रुंदीमुळे व दुरुस्तीमुळे सेवा रस्त्यावरून होणारी वाहतूक अधिक सहज, सुरक्षित आणि सुरळीतपणे चालणार असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रुंद झालेल्या सेवा रस्त्यावरून दुचाकी व तीनचाकी वाहनांनी प्रवास केल्यास मुख्य रस्त्यावरील वाहनांची गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुखकर होणार आहे तसेच स्थानिक वाहनचालकांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज राहणार नसल्याने अपघाताची शक्यता कमी होण्यास मदत होईल. एनएचएआयने केवळ चार ते पाच दिवसांत ही अतिरिक्त मार्गिका वापरासाठी खुली केली आहे.

हे फायदे होणार
या झालेल्या कामामुळे तिसरी मार्गिका उपलब्ध झाल्यामुळे वाहतुकीचे नियोजन अधिक शिस्तबद्ध आणि कार्यक्षमरीत्या करता येणार आहे
सकाळ-संध्याकाळ व सुट्ट्यांच्या दिवशी वाहतूक जास्त असलेल्या वेळेत होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल
जड वाहने आणि हलकी वाहने यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाल्याने सुरक्षिततेत वाढ होईल
हरिश्चंद्र येथे काम चालू असलेल्या पुलाच्या शेजारील सेवा रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाल्याने कोंडीच्या वेळी वाहतूक या रस्त्यावरून वळविणे शक्य होणार
शिवापूर ते देहूरोड (रावेत) सेवा रस्त्यावर वाढीव ३.५ मीटर रुंदीमुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल


वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी मुख्य रस्त्याचे पूर्ण डांबरीकरण करण्यात आले असून सेवा रस्त्यावर तिसरी मार्गिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्त्याची रुंदी वाढल्यामुळे वाहनचालकांना निश्चितच वेळेवर योग्य ठिकाणी जाण्यासाठी वेळेची बचत होणार आहे, प्रवासात वेळेची बचत होऊन मोठा दिलासा मिळणार आहे.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, पुणे-सातारा महामार्ग

या ठिकाणी समस्या ‘जैसे थे’च
प्रवाशांनी या झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले असले तरी या महामार्गावरील केळवडे, देगाव, धांगवडी (ता. भोर) या ठिकाणी तेथील शेतकरी व एनएचएआयमधील वादाने सेवा रस्ते अद्याप तयार नाहीत तर हरिश्चंद्र येथील पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. याबाबत देखील तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्या गावच्या स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.


6051

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com