

नसरापूर, ता. १० : भोर तालुक्यात जिल्हा परिषद- पंचायत समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र लढलेल्या दोन्ही शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुक्यातील दिग्गज नेते रणजीत शिवतरे यांना पराभवास सामोरे जावे लागले. जिल्हा परिषदेत दोन ठिकाणी राष्ट्रवादी, तर दोन ठिकाणी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य विजयी झाले, तर पंचायत समितीच्या आठ जागांपैकी चार जागी राष्ट्रवादी, व चार जागी भाजप विजयी झाल्याने समसमान झाल्या. त्यामुळे पंचायत समिती सभापतीची निवडणूक रंगणार आहे. एकंदरीत या निवडणुकीत राष्ट्रवादीची थोडी पिछेहाट व भाजपचा मात्र फायदा झाल्याचे दिसते.
जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या उत्रौली- कारी गटात गेल्या तीन निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होणारे राष्ट्रवादीचे रणजीत शिवतरे यांना यावेळी मोठ्या पराभवाला समोरे जावे लागले. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या पत्नी स्वरुपा यांनी त्यांचा पराभव केला. या गटातील पंचायत समितीच्या उत्रौली गणातील सुषमा चव्हाण व कारी गणातील गिता आंबवले या भाजप उमेदवारांचाही मोठा विजय झाला. तालुक्यातील राष्ट्रवादीला विचारमंथन करावयास लावणारा हा पराभव आहे, तर थोपटे यांनी विधानसभेनंतर पराभवाची मालिका खंडीत करून विजय मिळवत पंचायत समितीमध्ये देखिल चार सदस्य विजयी केल्याने तालुका भाजपमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. थोपटे यांच्या नेतृत्वात भाजपाने यावेळी राष्ट्रवादीबरोबरच शिवसेनेलादेखिल मोठा धक्का दिला आहे.
नसरापूर- वेळू गटात प्राबल्य असलेल्या शिवसेनेवर मात करण्यासाठी गेल्या अनेक निवडणुकीत प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस आताची भाजपने यावेळी पोपटराव सुके यांच्या माध्यमातून संघर्ष करत विजय साकारला. जिल्हा परिषदेबरोबर शिवसेनेच्या ताब्यातील वेळू पंचायत समितीवर देखिल ज्ञानेश्वर पांगारे यांच्या उमेदवारीतून विजय मिळवला. मागील दोन्ही जिल्हा परिषद निवडणुकासह लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मताधिक्य असलेल्या शिवसेनेला दोन्ही शिवसेना स्वतंत्र लढल्याने या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. एकत्र लढलेल्या राष्ट्रवादीने विशाल कोंडे यांच्या माध्यमातून नसरापूर पंचायत समितीची जागा जिंकली. तसेच, जिल्हा परिषदेसाठी गणेश खुटवड यांच्या माध्यमातून चार हजारावर मतदान घेत या गटात शिरकाव केला. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा नवखा व तरुण उमेदवार अनिकेत शिंदे याने शिवसेनेचे अनुभवी नेते कुलदीप कोंडे व उमेदवार अमोल पांगारे यांच्यासमोर आव्हान निर्माण करत या गटात दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. एक जिल्हा परिषद व एक पंचायत समितीची जागा जिंकल्याने भाजप या गटात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करेल; तर राष्ट्रवादीदेखील एक पंचायत समिती जागा जिंकून जिल्हा परिषदेला चांगली मते घेतल्याने आगामी काळात या गटावर लक्ष केंद्रित करेल, तर पुन्हा वर्चस्व निर्माण करण्यासाठी दोन्ही शिवसेनेला एकत्र यावे लागणार आहे.
दिवंगत काशिनाथराव खुटवड यांना मानणारा राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेला, परंतु एकदा शिवसेनेने विजय मिळवलेल्या भोंगवली कामथडी गटात यावेळी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विक्रम खुटवड यांना पक्षातीलच माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांच्या अपक्ष उमेदवारीचा सामना करावा लागला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत खुटवड यांनी विजय मिळवला. येथे भाजपच्या महेश टापरे यांनीदेखिल लक्षणीय मते घेत तिसरा क्रमांक घेतला. भाजपकडून उमेदवारी न मिळालेले ऐनवेळी शिवसेना शिंदे पक्षात गेलेले महादेव सोनवणे चौथ्या क्रमांकावर राहिले.
या गटात विक्रम खुटवड यांच्या पत्नी तृप्ती या कामथडी गणात रिंगणात होत्या. या पती पत्नीच्या उमेदवारीबाबत बरीच चर्चा झाली होती. त्याचा परिणाम राष्ट्रवादीच्या मतदारांवर होतो काय, याचे अंदाज बांधले जात होते, मात्र तृप्ती खुटवड यांनीदेखिल विजय मिळवला. या गणात भाजपच्या निता इंगुळकर दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या. भोंगवली गणात मात्र भाजपने विजय मिळवला. त्यांचे मागील निवडणुकीतील विजयी उमेदवार रोहन बाठे यांनी अपक्ष उमेदवार अक्षय सोनवणे यांच्यावर विजय मिळवला. राष्ट्रवादीच्या गणेश निगडे यांना तृतीय क्रमांकावर जात पराभवास सामोरे जावे लागले. या गटातील अपक्ष या पुढे कोणती भूमिका घेतात, राष्ट्र्वादीकडेच राहतात की भाजपला साथ देतात, हे पाहणे औत्सुक्याचे राहणार आहे.
धुमाळ यांचा प्रभाव ओसरला
भोलावडे- शिंद गटात यावेळी राष्ट्रवादीने जोरदार कमबॅक केले. राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या गटात मागील वेळी काँग्रेसचे विठ्ठल आवाळे विजयी झाले होते. यावेळी देखिल ते भाजपकडून लढत देत होते, मात्र राष्ट्रवादीने यावेळी नियोजनपूर्वक प्रयत्न करत या ठिकाणी विजय साकारला. भोलावडे गावचे सरपंच प्रविण जगदाळे यांनी राष्ट्रवादीकडून लढत देत आवाळे यांचा पराभव केला. त्यांच्या बरोबरच राष्ट्रवादीच्या मनीषा संतोष कंक यांनी शिंद गणात मोठा विजय मिळवला. भोलवडे गणात राष्ट्रवादीच्याच राजेश बोडके यांनी विजय मिळवला आहे. या गटातील काही भाग रणजीत शिवतरे यांच्या गटात होता. या गटातील जुने नेते मानसिंगराव धुमाळ यांनी याच निवडणुकीत राष्ट्रवादीसोडून भाजपमध्ये प्रवेश केला व भाजपच्या विजयासाठी त्यांनी काम केले, परंतु त्यांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादीच्या विजयावर कोणताही परिणाम झाला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.