मेंढपाळ म्हणतो, बिबट्याचा हल्ला; वन अधिकाऱ्यांकडून मात्र नकार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंढपाळ म्हणतो, बिबट्याचा हल्ला;
वन अधिकाऱ्यांकडून मात्र नकार!
मेंढपाळ म्हणतो, बिबट्याचा हल्ला; वन अधिकाऱ्यांकडून मात्र नकार!

मेंढपाळ म्हणतो, बिबट्याचा हल्ला; वन अधिकाऱ्यांकडून मात्र नकार!

sakal_logo
By

निरगुडसर, ता. १८ : मेंढपाळ म्हणतो, ‘हल्ला बिबट्यानेच केला’; तर वनविभागाचा अधिकारी म्हणतो, ‘झालेला हल्ला हा बिबट्याचा नाहीच’, परंतु, डॉक्टरांनी शवविच्छेदन केले असता, हा हल्ला ‘कुठल्याही एका वन्यप्राण्याचा असून, कुठला तो सांगता येणार नाही,’ अशी शक्यता व्यक्त करण्यात आली. ही घटना नागापूर (ता. आंबेगाव) येथे बुधवारी (ता. १८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
मेंढपाळ मोहन सिधा कोळपे यांचा नागापूर येथील बबुशा कोंडाजी वाघ यांच्या शेतामध्ये शेळ्या मेंढ्यांचा वाडा दोन दिवसांपासून आहे. बुधवारी (ता. १८) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन कोकरांवर हल्ला झाला. यामध्ये दोन्ही कोकरे जागीच ठार झाली, तर एक महिन्याच्या कोकराला पळवून नेले. हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे कोळपे यांनी सांगितले.
सरपंच गणेश यादव, माजी उपसरपंच सुनील शिंदे यांनी झालेल्या घटनेची माहिती वनविभागाला दिली. वनपरिमंडळ अधिकारी प्रदीप कासारे व प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी संकेत उगले यांनी बुधवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली. शेळ्यामेंढ्यांच्या वाड्याच्या सभोवताली पाहणी केली असता बिबट्याच्या पावलांचे ठसे कोठेही मिळाले नाहीत. तसेच, कोकरांवर झालेल्या जखमांच्या खुणांवरून हा हल्ला बिबट्याचा नसल्याचे सांगण्यात आले.
वळती येथील पशूधन विकास अधिकारी डॉ. सुरेश कड म्हणाले, ‘‘कोकरांचे शवविच्छेदन केले आता कोकरांच्या डोक्यांवर खोलवर जखमा आहेत. प्राण्याचे मोठे सुळे खोलवर घुसल्याने रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे हा हल्ला वन्यप्राण्याकडून झाला आहे.’’