
बिबट्याच्या हल्ल्यात जवळे येथे मेंढी ठार
निरगुडसर, ता. १६ : जवळे (ता. आंबेगाव) येथील गायकवाड मळा या ठिकाणी शेतकरी राहुल तुकाराम गावडे यांच्या गोठ्यामधील मेंढीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार केल्याची घटना बुधवारी (ता. १५) पहाटे चारच्या सुमारास घडली.
राहुल गावडे यांचा घराशेजारी गायांचा मुक्त गोठा असून गोठ्यात चार-पाच मेंढ्या आहेत. त्यातीलच एका मेंढीवर बिबट्याने हल्ला करत तिला ठार करून बाजूच्या उसाच्या शेतात ओढत नेत तिचा फडशा पाडला. याबाबत गावडे यांनी वन विभागाला कळवले असता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. या परिसरात ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. या अगोदरही गावडे यांच्या कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. वन विभागाने तातडीने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी दिनकर शिंदे, प्रकाश खिलारी, दत्ता गायकवाड, तुकाराम गावडे, यांसह जवळे ग्रामस्थांनी केली आहे.