पिंपळगाव रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात
निरगुडसर, ता. १३ ः पिंपळगाव ते निरगुडसर (ता. आंबेगाव) या सहा किमी रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाने खडी आणि डांबराने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.
पिंपळगाव ते निरगुडसर या सहा किमी रस्त्याच्या कामासाठी साडेसहा कोटीचा निधी मंजूर असून, कामाची निविदा देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने काढली आहे. मात्र, ठेकेदाराला कामाचा मुहूर्त अजूनही मिळत नाही. त्यामुळे रस्ता पूर्णपणे खड्ड्यात आहे. या खड्ड्यांमुळे प्रवासी वर्ग मात्र पूर्ण वैतागला आहे. तरी रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. तत्पूर्वी पडलेले खड्डे बुजवावे, या आशयाचे वृत्त ‘सकाळ’मध्ये छायाचित्रासह प्रसिद्ध झाले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने एक किमी अंतरावरील खड्डे मुरमाने भरले होते. पाऊस असल्याने डांबर टाकायला अडचण येत होती, आता पावसाने उघडीप दिल्याने रस्ते दुरुतीचे काम सुरू झाले आहे.
पिंपळगाव ते निरगुडसर या सहा किमी अंतरावर अंदाजे एक हजाराहून अधिक खड्डे आहेत. त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. आता खडी आणि डांबर टाकून रोलिंग करून काम केले जात असल्याने रस्ता सध्या तरी खड्डे मुक्त होणार आहे. खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्याने पिंपळगावचे माजी उपसरपंच धनेश पोखरकर यांच्यासह प्रवाशांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहे.
02948

