बिबट्यांपासून संरक्षणाचे ‘ढोल पोकळ’च

बिबट्यांपासून संरक्षणाचे ‘ढोल पोकळ’च

Published on

नवनाथ भेके : सकाळ वृत्तसेवा

निरगुडसर, ता. २४ : जुन्नर वनविभागातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव आणि खेड या चार तालुक्यांत बिबट्यांना पकडण्यासाठी एकूण ४०० पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. बहुतांश ठिकाणी पिंजरे उपलब्ध झाले असले तरी बिबट्यांपासून संरक्षणासाठी असलेल्या यंत्रणांची मात्र वानवा पाहायला मिळत आहे. वनविभागाची यंत्रणा अलर्ट आहे; पण सरकार नव्याने यंत्रणा पुरवण्यात ‘अलर्ट’ दिसून येत नाही त्यामुळे सरकारला बिबट्यांबाबत गांभीर्य आहे की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
जुन्नर वनविभागात बिबट्यांना पकडण्यासाठी ४०० पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये साधारण २५० ते ३०० नवीन पिंजरे सरकारकडून उपलब्ध झाले आहे. पिंजऱ्यांची संख्या हळू हळू का होईना वाढली असली तरी शेतकरी, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या यंत्रणा मात्र अपुऱ्या पाहायला मिळत आहे. जुन्नर वनविभागात बिबट्यांना पकडण्यासाठी यापूर्वी २०० पिंजरे उपलब्ध होते त्यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूचे प्रमाण वाढल्याने सरकारकडून एक हजार पिंजरे देण्याची घोषणा करण्यात आली त्यातील २५० ते ३०० पिंजरे उपलब्ध झाले त्यातही अनेक महिने गेले; पण हळू हळू का होईना पिंजरे उपलब्ध झाले आहेत; परंतु इतर यंत्रणा तातडीने पुरविण्याचा सरकारला पडला विसर. दरम्यान, गुजरातमधील वनतारामध्ये ५० बिबटे नेणार नेणार असे अनेकवेळा सांगितले जाते; पण या ५० बिबट्यांना नेण्याचा मुहूर्त कधी असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या यंत्रणा पुरवण्याचा सरकारला पडला विसर
एआय मशिन
सोलर अलर्ट
अनायडर मशिन
टेन्ट
सोलर लाइट
शाळांसाठी ब्रिगेड नेट
पेट्रोलिंग वाहने
झटका मशिन

माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राची स्थिती
केंद्राची क्षमता : ४०
सध्या संख्या : १३५
पिंजऱ्यात ठेवलेले : ८५
वनतारात जाणारे बिबटे : ५०

जुन्नर वनविभागात मागील काही महिन्यांत मिळालेल्या यंत्रणा
ए आय मशिन ५०
अनायडर मशिन ५०
टेन्ट ४००
सोलर अलर्ट ३०

वनविभागाची धडपड
बिबट्यांना जंगलातले अस्तित्व पुन्हा मिळवून देण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे.
जुन्नर वनविभागातील असलेल्या बहुतांशी गावात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे.
वनक्षेत्रामध्ये वनविभागाकडून सभोवताली जाळीचे कुंपण करून आतमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्यात येणार आहे.
वनातील चराईमुळे होणारे नुकसान याबाबत काळजी घेतली जाणार आहे.
आग लागून जंगलाचे नुकसान होत आहे याबाबत विशेष लक्ष देणार आहे आणि यातून वन्य प्राण्यांसाठी एक आश्रयस्थान उभे केले जाणार आहे.

हागणदारीमुक्त तरी उघड्यावर शौचास
जुन्नर वनविभागातील गावे हागणदारीमुक्त असून देखील अनेक ठिकाणी उघड्यावर शौचास अनेक जण जातात यावर संबंधित
ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी विशेष लक्ष दिले पाहिजे, यामुळे बिबट्यांपासून संरक्षण होण्यास मदत मिळेल.

जुन्नर वनविभागातील बिबट्यांची संख्या अचूक ओळखण्यासाठी पुढील दोन महिन्यांत ४५० ट्रॅप कॅमेरे बसवले जाणार आहेत. जुन्नर वन विभागात सरकारकडून २० पेट्रोलिंग वाहने उपलब्ध होणार आहे तसेच एआय मशिन, अनायडर मशिन, टेन्ट, सोलर अलर्ट आदी यंत्रणांची मागणी केली आहे.
- प्रशांत खाडे, जुन्नर, उपवनसंरक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com