ऊस लागवडीसह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या

ऊस लागवडीसह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या

Published on

नीरा नरसिंहपूर, ता.२७ : इंदापूर तालुक्यात बावडा, नरसिंहपूर पावसाने दीड महिन्यापासून ओढ दिली आहे. उसाच्या लागवडीसह पिकांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच शेतीची इतर कामे ठप्प झाली आहे. यामुळे गावोगावच्या मजुरांच्या हाताला कामे नसल्याने बाजारपेठा ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तरकारी पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने तरकारी महागली आहे. तसेच चारा पिकांच्या संभाव्य उपलब्धतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असल्याने दुग्धव्यवसाय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. औषधे, बि-बियाणांच्या दुकानात माल भरून शेतकऱ्यांची वाट पाहण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.
बावडा, नरसिंहपूर परिसरात पावसाने दांडी मारली आहे. उजनी धरण क्षेत्रात व परिसरात समाधानकारक पाऊस झाला असून, धरणातील पाणी साठा हळूहळू शंभरीकडे वाटचाल करीत आहे. उजनी धरणाने प्रथमताच जुलै महिन्यात शंभरी गाठल्याने भीमा नदीवरील माढा व इंदापूर तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाणी योजनांचा प्रश्न निकाली निघाला आहे.

शेतातील कामे ठप्प झाल्याने शेतमजुरांच्या हाताला कामे नसल्याने मोठी आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे बाजारपेठेत माल आहे परंतु खरेदीसाठी पैसा नसल्याने कोणी फिरकायला तयार नसल्याने बाजारपेठा ग्राहकांन अभावी ओस पडल्या आहेत.

शेती मोकळी ठेवण्याची वेळ
शेतकऱ्यांनी पावसाच्या जिवावर उसाची लागवड करण्यासाठी शेत नांगरून, खांदून, ओढून, सऱ्या सोडून ठेवल्या आहेत. पाऊस पडल्याबरोबर ऊस बेणे आणून लागण दाबायची एवढेच काम शिल्लक ठेवले आहे. पावसाच्या प्रतीक्षेत शेती मोकळी ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जर का अशीच परिस्थिती राहीली तर मात्र दुष्काळ पडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

बाजारपेठ पडली थंड
पावसाने ओढ दिली असल्याने शेतकरी, शेतमजूर, दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन, व्यापारी, नागरिक, चिकन व मटण दुकानदार हातघाईवर आला आहे. बाजारपेठच थंड पडल्याने पैसा फिरायला तयार नाही. त्यातच नीरा व भीमा नद्यांना पाणी असूनही मोटारी बाहेर काढून ठेवल्याने पिकांना पाणीही देता येईना व पाऊसही पडेना त्यामुळे शेतकऱ्यांची द्विधा मनःस्थिती झाली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com