नीरा नरसिंहपूर परिसरात मंगळागौर साजरी

नीरा नरसिंहपूर परिसरात मंगळागौर साजरी

Published on

नीरा नरसिंहपूर, ता. १ : नागपंचमीनिमित्त नीरा नरसिंहपूर (ता. इंदापूर) परिसरातील गावांत मंगळागौर उत्साहात साजरी करण्यात आली. महिलांनी पारंपरिक गाणी, फुगड्या व झोका खेळण्याचा आनंद लुटला. तर तरूणांनी पतंग, वावडी उडवण्याचा, सुरलोपांट खेळण्याचा आनंद लुटला. पावसाच्या हलक्या सरींमुळे आनंदात अधिकच भर पडली.
पिंपरी बुद्रुक येथील मानकरी पोलिस पाटील वर्धमान आजिनाथ बोडके, ॲड. भाग्यवंत बोडके यांच्याकडे परंपरेप्रमाणे मंगळागौर उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक पूजेनंतर सतीश सूर्यवंशी यांच्या डोक्यावरून मंगळागौरीची प्रतिकृती फटाके वाजवत, हलगी, लेझीमच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भीमा नदी तीरावर जाऊन आरती करून नदीपात्रात विसर्जन करण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी गाणी म्हणत मंगळागौरीला निरोप दिला.
गणेशवाडी येथील मानकरी ज्ञानदेव घोगरे, कल्याण घोगरे यांच्या पाटील वाड्याची मातीची प्रतिकृती कोंडिबा कुंभार यांनी तयार केली. प्रतिकृतीच्या वरील बाजूस मातीचे अश्‍वारूढ देव ठेवण्यात आले. सायंकाळी प्रतिकृती वाजत-गाजत भीमा नदीच्या तीरावर नेण्यात आली. नदीकाठावर आरती करून त्याचे विसर्जन करण्यात आले. तर ओझरे येथील नरसिंह पालवे यांच्याकडे, गोंदी येथे गोविंद सुळ यांच्याकडे परंपरेने मंगळागौर असते. परीसरातील नरसिंहपूर, सराटी, गिरवी, टणू गावातही नागपंचमी सण, मंगळागौर साजरी करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com