बावडा येथील महामार्गावर गतिरोधक बसवा

बावडा येथील महामार्गावर गतिरोधक बसवा

Published on

नीरा नरसिंहपूर, ता. १२ ः इंदापूर- अकलूज मार्गावरील बावडा (ता. इंदापूर) येथील भांडगाव चौक ते शाहू महाराज चौकादरम्यान वर्दळीच्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत. तसेच, अवजड वाहनांवर कारवाई करून अपघात कमी करण्याची मागणी स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे, अश्वजित कांबळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. कार्यवाही केली नाही तर धरणे आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बावडा गावातून इंदापूर- अकलूज मार्गावरून हलक्या व अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. भांडगाव चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चौक ते शाहू महाराज चौकादरम्यान मोठ्या प्रमाणात वर्दळ होत आहे. तसेच, भांडगाव चौकात श्री शिवाजी विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठी वर्दळ असते. यादरम्यान अनेक लहान- मोठे अपघात झाले असून, एका विद्यार्थिनींसह पाच जणांना जीव गमवावा लागला आहे.
नरसिंहपूर बाजूकडून माती, मुरूम, वाळू, खडी आदी गौण खनिजाची अवजड वाहतूक बिगर नंबरच्या डंपर, हायवामधून रात्रंदिवस नियम पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. बारामती येथे घडलेल्या अपघातानंतर बारामती शहर वाहतूक पोलिसांनी वाहनांवर कारवाई केली. त्याच धर्तीवर बावडा परिसर व इंदापूर तालुक्यात कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

इंदापूरकडून येणाऱ्या वाहनांना अनेकदा बावडा गावातील दुभाजक न दिसल्याने मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये वाहनांचे व दुभाजकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच, भांडगाव चौकात विद्यालय सुटल्यानंतर मोठी गर्दी होऊन सतत अपघात घडत असतात. नरसिंहपूर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर असून, येथेही सतत अपघात घडतात. त्यामुळे याठिकाणी गतिरोधक बसवून बेकायदेशीर अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिस व परिवहन विभागाने कारवाई करावी. तसेच, शाळा व चौकात सुरक्षेचे सूचना फलक लावावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती तहसीलदार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती, इंदापूर पोलिस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, इंदापूर आदींना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com