कपर्दिकेश्वर मंदिरातील कलात्मक पिंडींचे भाविकांना खास आकर्षण
ओतूर, ता.२७ : ओतूर (ता.जुन्नर) येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराची श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी मोठी यात्रा भरते. मंदिरात शिवलिंगावरील तयार करण्यात येणाऱ्या कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडींचे भाविकांना खास आकर्षण असते. त्याचे दर्शन घेणाऱ्यांसाठी भाविक गर्दी करतात. येथील दर्शनाने सर्व मनोकामना पूर्णा होतात, अशी भाविकांची भावना आहे.
श्री कपर्दिकेश्र्वर देवधर्म संस्थेकडून प्रत्येक सोमवारी विविध धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंदिराबरोबर येथे जगतगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे गुरू बाबाजी चैतन्य महाराज यांच्या संजीवन समाधीचे ही दर्शन ही भाविकांना घेता येते.
मंदिराजवळील पर्यटनस्थळे
* मुंजोबा डोंगरावरून पडणारा धुरनळी धबधबा
* उदापूर कोपरे मार्गावरील मुथाळणे घाट व कोपरे, मांडवे, मुथाळणे खोरे
* ओतूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील माळशेज घाट,
* पिंपळगाव जोगा धरण, खिरेश्वर येथील काळू धबधबा.
भाविकाच्या सुरक्षेसाठी
* कपर्दिकेश्र्वर मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे.
* ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे पथक तैनात
* ओतूर पोलिसांकडून फिरते गस्त पथक तसेच अतिरिक्त पोलिसही तैनात
* दर्शन रांगेत ट्रस्टचे स्वयंसेवक व पोलिस कर्मचारी आणि होमगार्ड
* अभिषेकसाठी मंदिराबाहेर जागा उपलब्ध
* चैतन्य विद्यालयाच्या महालक्ष्मी मैदानवर वाहनतळ
अशी घ्या काळजी
भाविकांनी यात्रा परिसरात फिरताना आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी. तसेच सोन्या चांदीचे दागिने शक्यतो सोबत घालुन येण्याचे टाळावे. दर्शन रांगेतच घ्यावे दर्शन रांग सोडून पुढे मागे होणे टाळावे. मंदिर परिसरात प्लास्टिक बंदी आहे
मदतीसाठी संपर्क
ओतूर पोलिस ठाणे : ०२१३२२६४२५०, ९५५२६८७१००
भाविकांनी आवश्यक सोयी सुविधा कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत. श्रावणी सोमवारी पूजा व अभिषेक करून सकाळी सहा वाजता मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येते. त्याआधी श्रावणातील प्रत्येक रविवारी पिंडीचे तांदूळ स्वीकारले जातात. मंदिर परिसरात भाविकांना बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा ही लाभ मिळतो.
- अनिल तांबे, अध्यक्ष, कपर्दिकेश्र्वर देवधर्म संस्था
00486, 00487