ओतूर येथे ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त कार्यक्रम
ओतूर, ता. ३ : ओतूर (ता. जुन्नर) येथे एक ऑक्टोंबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ ओतूर व ग्रामपंचायत ओतूरच्यावतीने सर्व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रात आयोजित केला होता.
या कार्यक्रमात ८० वर्षावरील ज्येष्ठांना पुढील थंडीचा विचार करू वूलनचे मफलर व ज्येष्ठ नागरिक संघाचे नाव असलेली आकर्षक पिशवी व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. तर इतर उपस्थित सभासदांचा मफलर व गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.
ज्येष्ठ नागरिक संघाचे संचालक विलास सुतार यांनी विविध दाखले देत ज्येष्ठांनी आपले पुढील आयुष्यात आनंदी व उत्साहाने जीवन व्यतीत केले पाहिजे, आरोग्याची वेळेवर काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला दिला व सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी ओतूर ग्रामपंचायतच्या सरपंच छाया तांबे व उपसरपंच प्रशांत डुंबरे उपस्थित होते, त्यांनी सर्व ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा दिल्या व पुढील काळात सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठ सभासदांपैकी प्रतापराव हांडे देशमुख, माधवराव डुंबरे, वसंत डुंबरे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
शेवटी संघाचे अध्यक्ष रा. ज्ञा. डुंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे सचिव बाबाजी डुंबरे, कोषाध्यक्ष पांडुरंग अहिनवे, कार्याध्यक्ष मा. ल. जाधव, भिवाजी माळवे, अशोक सहाणे, रामदास ढमाले, महादेव ओतूर कर, आत्माराम खराडे, बबन डुंबरे, एकनाथ डुंबरे, दिलीप घोलप, बाळासाहेब हाडवळे, गणपत डुंबरे आदी सभासदांनी सहकार्य केले. संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रेय डुंबरे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.