डिंगोरे येथील विद्यालयात ‘विद्यार्थी दिवस’
ओतूर, ता. ७ ः भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रभावना जागवणारे ‘वंदे मातरम्’ हे गीत यंदा दीडशे वर्षांचे झाले. या ऐतिहासिक गीताच्या स्मृती आणि ७ नोव्हेंबर या विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने पुष्पावती विद्यालय, डिंगोरे (ता. जुन्नर) येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
शिक्षक प्रतिनिधी वैभव देशमुख यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘‘वंदे मातरम् या गीताने स्वातंत्र्यलढ्यात असंख्य देशभक्तांच्या ओठांवर जयघोष दिला. या गीतातून भारतमातेप्रती कृतज्ञता, अभिमान आणि प्रेम व्यक्त होते. तसेच, ७ नोव्हेंबर १९०० या दिवशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सातारा येथील शाळेत प्रवेश मिळाला, हा दिवस भारताच्या शैक्षणिक क्रांतीचा आणि युगांतराचा प्रारंभ मानला जातो. डॉ. आंबेडकर आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगले. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्या प्रेरणेने ज्ञानाचा सतत शोध घेत रहावे.’’
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद माळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रतिलाल बागुल, दिनेश पाटील, दीपा सावंत, अनुराधा नलावडे, साधना तांबे, जगन्नाथ गाढवे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दत्तात्रय घोलप यांनी केले.

