जुन्नर तालुक्यात ऊसतोडणीमुळे बिबटे सैरभैर
ओतूर, ता. १५ : जुन्नर तालुक्यातील बिबट समस्या फक्त वन विभागापूर्ती मर्यादित राहिली नाही तर सामाजिक अडचण होऊन बसलेली आहे. तालुक्यातील ऊस तोडणीमुळे बिबटे सध्या सैरभैर झाले आहेत. त्यांच्यावरील नियंत्रणासाठी वनविभागाबरोबरच स्थानिक प्रशासन, पर्यावरण तज्ज्ञ, साखर कारखाना आणि नागरिक यांचे सामूहिक योगदान आवश्यक आहे.
वैज्ञानिक उपाययोजना, जंगलांचे संरक्षण, बिबट जन्मदर घटवले आणि मोठ्या प्रमाणावर जनजागृती हेच या समस्येचे दीर्घकालीन समाधान ठरू शकते. पण त्यासाठी नियोजन, संवेदनशीलता आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी अत्यावश्यक आहे. वनविभागाला लोकाभिमुख काम करून स्थानिकांचा विश्वास संपादन करून बिबट समस्येवर काम करणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञ तसेच शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
ऊसतोडणी दरम्यान बछडी आढळतात
उस तोडणी दरम्यान बिबट्याची बछडी ठिकठिकाणी मिळून येऊ लागल्याने ती सुरक्षितरित्या परत मादीबरोबर जाण्यासाठी वनविभागाला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागतात. कारण बछडी दिसून न आल्याने मादी बिबट हिस्र होऊन मानव बिबट संघर्षात वाढ होते. त्यामुळे बिबट बछडी मिळून आल्यावर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ येथे पिंजरा लावून मादी बिबट पकडा म्हणून मोठ्या प्रमाणावर मागणी करतात. त्यामुळे वनविभागाकडून तेथे मादी बिबट जेरबंद करण्यासाठी पिंजरा ही लावतात. मात्र, बिबट बछडी वनविभागाकडून पिंजऱ्यात न ठेवता पिंजऱ्याच्या बाजूला ठेवतात जेणे करून बिबट्याची मादी भक्षासाठी जर पिंजऱ्यात अडकली तर चालेल पण बिबट मादी पिंजऱ्यात न जाता बछडी दिसली नाही म्हणून उग्र होऊन इतरत्र हे हल्ले करू लागली तर तो संघर्ष मोठा होऊन त्यात एखादी मोठी घटना घडू शकते. त्यामुळे ऊसतोड दरम्यान बिबट्याची बछडी आढळून आल्यास त्वरित वनविभागाला संपर्क करून सर्वांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. नुकतीच उदापूर येथे बिबट्याची दोन बछडी ऊसतोडी दरम्यान आढळून आली होती.
पोषक वातावरणामुळे प्रजनन क्षमतेत वाढ
जंगलात अन्न पाण्याची वणवा यामुळे बिबट्यांनी जंगल सोडले असून, बागायती क्षेत्रात ऊस, केळी व इतर शेतामध्ये राहु लागले. मात्र आता जी बिबट्याची पिढी आहे. तिचा जन्मच उसात किंवा इतर बागायती क्षेत्रात झाला असून, बिबट्यांनी स्वतःच्या जीवनचर्येत त्याप्रमाणे बदल केला आहे. त्यामुळे आता या पोषक वातावरणामुळे बिबट्याची प्रजनन क्षमता ही वाढली.
व्हिडिओही व्हायल होत असल्याने दहशत
बिबटे शेतात, ओढ्या नाल्यात तर दिसून येत आहेच. मात्र अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर रस्ता ओलंडता तसेच वाड्यावस्त्यावर रस्ता ओलांडताना बिबटे दिसून येत आहे. तसेच आता शेतातील घरांसह महामार्गावर आणि दुकानावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबटे निदर्शनास पडत आहेत. सदर बिबट्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायला होतात. कधी कधी जुने व्हिडिओही परत व्हायल होत असल्याने दहशत पसरली जाते.
कल्याण महामार्गावर बिबट्या ऐटीत
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर बुधवारी (ता.१२) ओतूर आणि उदापूर दरम्यान हॉटेल वृंदावनसमोर सहावाजे दरम्यान बिबट्याची एका दुचाकीला धडक होऊन एक युवक जखमी झाला. तसेच त्यांनतर रात्री ११.३० ते १२ दरम्यान याच ठिकाणी बिबट्या महामार्ग ओलांडताना दिसला व परत एका वाहनाच्या मागे लागलेला दिसून आला. तसेच त्या आधी याच महामार्गावर डुंबरवाडी गावच्या हद्दीत मोरीच्या कठड्यावर बिबट्या ऐटीत चालताना दिसून आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

