कार्यकर्ता सत्यशोधक परंपरेवर चालणारा असावा

कार्यकर्ता सत्यशोधक परंपरेवर चालणारा असावा
Published on

ओतूर, ता. २५ : ‘‘सत्यशोधकांची दीडशे वर्षांची परंपरा आहे. त्यात महात्मा जोतीराव फुले हे देशातील सर्व समाजसुधारकांचे मेरुमणी आहेत. त्यामुळे चळवळ आणि कार्यकर्ता हा फुल्यांच्या सत्यशोधक परंपरेवर चालणारा असावा,’’ असे प्रतिपादन ‘अंनिस’चे अविनाश पाटील यांनी केले.
महात्मा फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त ओतूर (ता. जुन्नर) येथील सत्यशोधक समाजातर्फे जिल्हा परिषद मुलींची शाळा नंबर २ येथे विचारवंतांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी अविनाश पाटील बोलत होते, या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर येथून महात्मा फुले प्रतिष्ठानचे अरविंद खैरनार, भाऊसाहेब जाधव, कल्याण रंधे, राष्ट्रसेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष शरद कदम, प्रा. दत्ताजीराव कदम, अर्चना ताजणे उपस्थित होते.
प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नरेंद्र डुंबरे यांनी प्रतिष्ठानची ओळख, तसेच जोतीरावांच्या द्विजन्मशताब्दी निमित्त घेणार असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. सारथ्य फाउंडेशनचे कार्यकर्ते प्रमोद बोडके यांनी शाळेच्या नूतनीकरणाविषयी माहिती दिली. शाळेतील शिक्षक रवींद्र डुंबरे यांनी शाळेचा इतिहास, सुरू असलेली कामे, राबवायचे उपक्रम याविषयी माहिती दिली.
श्रीकांत ढेरंगे म्हणाले, ‘‘फुले विचारात शेती, शिक्षण, पाणी, वृक्ष, महिला, मुले, वारकरी यांना महत्त्व राहीले. या विषयांना अनुसरून आगामी शंभर वर्षांचे उद्दिष्ट ठेवूनच सत्यशोधक भाऊराव कोंडाजी डुंबरे पाटील प्रतिष्ठान कार्यरत राहणार आहे.’’ विलास डुंबरे म्हणाले, ‘‘त्याकाळात महात्मा फुले आणि भाऊराव डुंबरे शेतीसाठी धरणांचा विचार व आराखडा मांडत होते. त्याच्याच फलस्वरुप चिल्हेवाडी व इतर धरणे प्रत्यक्षात आली.’’
सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष खैरनार, जुन्नर तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष गंगारामबुवा डुंबरे, सत्यशोधक दत्ताजीराव जाधव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष शिरीष भोर, माजी जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात यांनी मार्गदर्शन केले. बैठकीसाठी राहुल हुलवळे, प्रा. फापाळे, सनय प्रकाशनचे शिवाजी शिंदे यांनीही मनोगते व्यक्त केली. सत्यशोधक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधाकर डुंबरे यांनी आभार मानले.

विविध ठराव व सूचना
या वेळी शरद कदम यांनी, फुले द्विशताब्दी निमित्ताने ‘शिवनेरी ते भिडेवाडा’ असा मार्च काढावा, सत्यशोधकांचे राज्यस्तरीय अधिवेशन घ्यावे. तरुणांना व विद्यार्थ्यांना फुले विचारांकडे आकृष्ट करण्यासाठी चित्रमय चरित्र, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, अभ्यासवर्ग व इतर कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे सुचविले. सत्यशोधक प्रतिष्ठानचे सचिव जयप्रकाश डुंबरे यांनी, चिल्हेवाडी जलाशयाला ‘सत्यशोधक भाऊराव कोंडाजी डुंबरे पाटील जलाशय’ असे नाव द्यावे व परिसरातील सत्यशोधकांच्या वारसांचा एकत्रितपणे मानपत्र देऊन सत्कार करावा, असे ठराव मांडले. ते एकमताने मंजूर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com