
विघ्नहर गणपतीला फुलांची आरास
ओझर, ता. २५ : श्री क्षेत्र ओझर (ता. जुन्नर) येथे माघ शुद्ध चतुर्थी निमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत गणेश जयंतीचा उत्सव झाला. फुलांचा वर्षाव करत मोरया गोसावींच्या पदांचे गायन करून गणेश जयंती साजरी केली. मंदिराच्या गाभाऱ्यात गणेशमूर्ती जवळ फुलांची आकर्षक आरास केली होती. पहाटे पाच वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त आनंदराव मांडे, रंगनाथ रवळे, मंगेश मांडे, श्रीराम पंडित, राजश्री कवडे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्रींचा अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले केले. गणपती बाप्पा मोरयाच्या नामघोषात भजनाच्या गजरात फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता श्रींचा गणेश जयंती जन्मोत्सव सोहळा पार पडला. या वेळी म्हस्के व भालेराव परिवारातील व्यक्तींनी भाविकांसाठी अन्नदान केले. तुषार कवडे, प्रशांत कडूसकर, मदन जोगदंड, गणेश सोमोशी तसेच इतर भाविकांनी देणगी दिली.
चवथ्या द्वारयात्रेसाठी टाळ, मृदंगाच्या सुमधुर सुरात भजन म्हणत सकाळी दहा वाजता श्रींची पालखी ओझर येथील आंबेराईकडे मार्गस्थ झाली. श्रींच्या पालखीचे बारा वाजता मंदिरात आगमन झाले. हभप गणेश महाराज वाघमारे यांनी देव जन्माचे कीर्तन केले. या वेळी देवस्थानचे पुजारी हेरंब जोशी, जयेश जोशी, अमय मुंगळे यांनी मोरया गोसावी पदांचे गायन केले.