कुकडी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

कुकडी नदी प्रदूषणाच्या विळख्यात

Published on

ओझर, ता. २४ ः कुकडेश्वर (ता. जुन्नर) येथे उगमस्थान असलेली कुकडी नदीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावोगावचे सांडपाणी नदीत सोडले जात असल्यामुळे पाणी प्रदूषित होच असून, नदीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
जुन्नर तालुक्याच्या कृषी सिंचन विकासात कुकडी नदीचे मोलाचे योगदान आहे. कुकडी प्रकल्पामुळे पुणे, तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर जिरायती जमीन बागायती झाली आहे. अनेक ठिकाणी नदीचे पाणी धरण आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडविण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या आजूबाजूचा परिसर सुजलाम् सुफलाम् बनला असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे राहणीमानही उंचावले आहे. मात्र, जुन्नर शहर व जुन्नरच्या पूर्वभागातील सर्वच गावांचे सांडपाणी कोणतीही प्रक्रीया न करता थेट नदीपात्रात सोडले जाते. एकाही गावामध्ये सांडपाणी प्रक्रिया करण्याची व्यवस्था उपलब्ध नाही. ही बाब ‘सकाळ’ने बातम्यांच्या माध्यमातून अनेकदा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. परंतु, त्याबाबत शासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही.
अनेक गावातील कचरा डेपो नदीच्या कडेला असल्याने त्यातील प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल नदीच्या पाण्यासोबत वाहून येते. नदीकाठचे शेतकरी शेतातील अच्छादन कागद, कचरा, संपुष्टात आलेल्या शेतमालाचे अवशेष, खराब झालेला शेतमाल योग्य विल्हेवाट न लावता सर्वकाही नदीपात्रात फेकून देतात. नदीला गंगामाईचा पवित्र दर्जा देणारे अनेक श्रद्धाळू नागरिक घरच्या देवपूजेवेळी दररोज जमा होणारे निर्माल्य, घरातील देवदेवतांचे काचेचे फोटो, जुने देव्हारे, सुकून गेलेल्या तुळशीची झाडे प्लॅस्टिक पिशव्यांसह नदीच्या टाकतात. तसेच, छोट्या- मोठ्या उद्योगातून येणारे रसायन मिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. या सर्व बाबींमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत असून, नदीचे निसर्ग सौंदर्य धोक्यात आले आहे.

जलचर सृष्टीला धोका
प्रदूषित पाण्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन अनेक नागरिक आजारी पडत आहेत. तसेच, प्रदूषित पाण्यावर वाढणाऱ्या वनस्पतींचा प्रादूर्भाव वाढल्याने जलचर सृष्टीला धोका निर्माण झाला आहे. या सर्व गोष्टी घडत असताना प्रशासन मात्र अनेक वर्षांपासून मूग गिळून बसले आहे. नदीचे अस्तित्व कायम राखण्यासाठी नदीतील पाण्याच्या प्रदूषणाबाबत ठोस उपाययोजना करून, जबाबदार घटकांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे.

01751

Marathi News Esakal
www.esakal.com