सर्वपक्षीय पुढारी म्हणतात ‘आपलीच हवा’

सर्वपक्षीय पुढारी म्हणतात ‘आपलीच हवा’

पाबळ, ता. १५ : शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात गावोगावी सर्वपक्षीय पुढारी ‘आपलीच हवा’ असल्याचे सांगत असून अनेकांनी आपापल्या उमेदवारांसाठी पैजा लावल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दोन्ही बाजूंकडून आम्हालाच मताधिक्य मिळणार, असे दावे केले जात आहेत. असे चित्र असले तरी मताधिक्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे.

घटलेली मतांची टक्केवारी, मतदानाच्या दिवशी दुपारी असलेला उन्हाचा चटका, सायंकाळच्या सुमारास आलेला पाऊस, मतदान यादीत नावे नसल्याने वंचित राहिलेले मतदार या गोष्टींमुळे अनेकांना अचूक अंदाज वर्तविणे शक्य होत नाहीये. सोशल मीडियाच्या माध्यमातून अंदाज काढण्यासाठी अनेकजण पोल घेत आहेत. त्यामुळे गावोगावी पारावर तरुण, ज्येष्ठांमध्ये ‘घड्याळ’ चालणार की ‘तुतारी’ वाजणार, चार जूनला निकाल काय लागणार यावरच सर्वत्र चर्चा रंगली आहे. याबाबत अनेक गावांतील कार्यकर्त्यांमध्ये गावपातळीवरील ढाब्यांपासून ते पंचतारांकित हॉटेलवर जेवण देणे यांसारख्या छोट्या मोठ्या पैजा लागल्या आहेत. यामुळे अनेकांची निकालाबाबतची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटलांचा असलेला दांडगा जनसंपर्क, प्रत्येक गावात महायुतीच्या कार्यकर्त्यांचे असलेले बळ, गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही केलेली विकासकामे, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर रविवारी घेतलेले जनता दरबार, बैलगाडा शर्यतीसाठी केलेले प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या प्रचार सभा, दिलीप वळसे पाटील, अतुल बेनके, दिलीप मोहिते, चेतन तुपे, महेश लांडगे यांचा महायुती म्हणून असलेला पाठिंबा व ग्रामपंचायती, सोसायट्या, पतसंस्था, बँका, भीमाशंकर कारखाना, बाजार समिती आदी शक्तिस्थाने या जमेच्या बाजू आढळराव पाटील यांना मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास महायुतीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

तर, अमोल कोल्हे यांनी पक्षाक्षी ठेवलेली निष्ठा, प्रभावी वक्तृत्व शैली, निष्कलंक प्रतिमा, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव मिळावा यासाठी संसदेत केलेली भाषणे, खते-औषधांच्या वाढलेल्या किमती, वाढती महागाई, बेरोजगारी, कांदा निर्यातबंदी विरोधात उठविलेला आवाज तसेच बैलगाडा शर्यतीसाठी केलेले प्रयत्न, शरद पवार यांच्याबाबत असलेली सहानुभूती, तीन वेळा मिळालेला संसदरत्न पुरस्कार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा या जमेच्या बाजू डॉ. अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळवून देतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या दोन्ही बाजूंकडून आम्हालाच मताधिक्य मिळणार, असे दावे केले जात आहेत तर दुसरीकडे मतदारांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यामुळे येत्या चार जूनला मतदार नक्की कोणाला कौल देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा कौल कुणाला
शेतीमालाचे बाजारभाव, कांदा निर्यात बंदी, खतांचे वाढलेले बाजारभाव, दुधाचे दर, वाढलेली महागाई, पाबळ, केंदूर, कान्हूर मेसाई परिसरातील १२ गावांच्या पाण्याचा प्रलंबित असलेला प्रश्न या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नाराजीमुळे शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा कौल कुणाला मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com