शिरूरमधील सात गावांची भागेना तहान

शिरूरमधील सात गावांची भागेना तहान

पाबळ, ता.१ : शिरूर तालुक्यातील पाबळ, केंदूर, धामारी, कान्हूर मेसाई, खैरेवाडी, हिवरे, खैरेनगर या सात गावांतील २७ हजार ४७३ लोकांची व सहा हजार ७५४ जनावरांची तहान भागविण्यासाठी दररोज २० टँकरद्वारे ७० खेपा करून पाणीपुरवठा केला जात आहे. तळेगाव ढमढेरे व मोराची चिंचोली गावांचे टँकर मागणी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले असल्याची माहिती शिरूरचे गट विकास अधिकारी महेश डोके यांनी दिली.

टँकरच्या खेपा अपुऱ्या पडत असल्याने त्या वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता वाढल्यास व पावसाने ओढ दिल्यास टँकरच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षी पर्जन्यमान कमी राहिल्याने दुष्काळाची दाहकता लवकरच जाणवू लागली. त्यातच ग्रामीण भागात उन्हाचा पारा ४० पार गेल्याने वाढत्या उन्हाच्या तडाख्याने पाणी पातळी झपाट्याने खाली गेली. त्यामुळे विहिरी, कूपनलिका आदी पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागल्याने पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न भीषण बनला. त्यामुळे टँकर व चारा छावणी सुरू करण्याची मागणी वाढू लागली.
जून महिना सुरू झाला असल्याने नागरिकांना पावसाचे वेध लागले आहे. अपुऱ्या पाण्यामुळे दैनंदिन जीवनातील गणित विस्कळित झाले. मोजके पाणी पिण्यासाठी, जनावरांसाठी व घरकामात वापरासाठी वापरताना महिलांना कसरत करावी लागत आहे. पाण्याअभावी शेती पिके जळून चालली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

चारा टंचाईमुळे दूध व्यवसाय अडचणीत
शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. मात्र, अगोदरच पशुखाद्याच्या वाढलेल्या दरामुळे व दुधाला मिळत असलेल्या कमी भावामुळे पशुपालक शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यातच दुष्काळामुळे चारा टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे पशुधन जगवायचे तरी कसे? असा यक्ष प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहे.

शिरूर तालुक्यात सद्यस्थतीला सात गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. चिंचोली मोराची व तळेगाव ढमढेरे गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झाले असून, ते मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाला पाठवले आहे. लवकरच मंजुरी मिळेल व टँकर सुरू केले जातील.
- महेश डोके, गट विकास अधिकारी शिरूर


टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असलेली गावे- लोकसंख्या - टँकर (खेपा)
गाव -- बाधित लोकसंख्या -- टँकर (खेपा)
पाबळ -- ९०८० -- ६ (२६)
केंदूर -- ३९०७ -- ४ (१२)
धामारी -- ३९०७ -- १ (४)
कान्हूर मेसाई -- ५९३५ -- २(६)
खैरेनगर -- १२६१ -- १(२)
हिवरे -- २१२३ -- १ (३)
खैरेवाडी -- १२६० -- १(२)
पाबळ (जनावरांसाठी) - ६७५४ - ४(१५)


गाव -- ७
लोकसंख्या -- २७४७३
जनावरे (पाबळ गाव) -- ६७५४
टँकर (खेपा) -- २०(७०)


टँकरची मागणी असलेली गावे, लोकसंख्या - आवश्यक टँकर (खेपा)
गाव - बाधित लोकसंख्या- टँकर (खेपा)
मोराची चिंचोली -- २८४० -- २ (५)
तळेगाव ढमढेरे -- १४८२ -- १(२)


00672

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com