गणेगावच्या कालव्यावरील पुलास भगदाड

गणेगावच्या कालव्यावरील पुलास भगदाड

पाबळ, ता.८ : गणेगाव खालसा (ता.शिरूर) येथील गणेगाव-हिवरे-केंदूर रस्त्यावरील चासकमान कालव्यावरील पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पुलाच्या संरक्षण कठड्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पुलावरून प्रवास करावा लागत आहे.

केंदूर रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असून, शेतकरी शेतमाल वाहतुकीसाठी या रस्त्याचा वापर करतात. या रस्त्यावरील चासकमान कालव्यावरील पुलावर पावसाचे पाणी साचून पुलाला भगदाड पडले आहे. तसेच पुलावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज न आल्याने छोटे मोठे अपघात घडत आहे. त्यामुळे चासकमान पाटबंधारे विभागाने या पुलाचे तातडीने स्टक्चर ऑडिट करावे. तसेच पुलाची त्वरित देखभाल दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

प्रशासनाचा ग्रामस्थांच्या मागणीकडे काणाडोळा
चासकमान कालव्यावर पुलाची दुरवस्था झाली असून, पुलाचे तातडीने स्टक्चर ऑडिट करावे. तसेच पुलाची तत्काळ देखभाल दुरुस्ती करावी. यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर यांच्या वतीने जुलै २०२३ मध्ये पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, वर्षभरानंतर ही काम जैसे थे अवस्थेत आहे. निधी उपलब्ध नसल्याचे तोंडी कारण देत चासकमान पाटबंधारे विभागातील अधिकारी समस्येकडे काणाडोळा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

गणेगाव खालसा येथील चासकमान कॅनॉलवरील पुलाची दुरवस्था झाली असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची बाब चासकमान पाटबंधारे उपविभाग क्र ४ शिक्रापूर यांच्या कार्यालयाला वर्षभरापूर्वी कळविले आहे. परंतु अद्याप पुलाचे काम करण्यात आले नाही. प्रशासनाला दुर्घटना घडल्यानंतर जाग येणार आहे का? लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- पंकज बांगर, सचिव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर

गणेगाव खालसा येथील चासकमान कालव्यावर रस्त्यावरील पुलाला भगदाड पडले असल्याची तक्रार मिळाली आहे. सदर पुलाचे काम करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवले आहे. तसेच, कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून यांत्रिकी विभागामार्फत तत्काळ तात्पुरती दुरुस्ती करण्याचे नियोजन केले आहे.
- आश्विन पवार, उपविभागीय अधिकारी, चासकमान कालवा उपविभाग क्र. ४, शिक्रापूर

00746

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com