चोरटे, अवैध धंदेचालकांचा गावागावांत उच्छाद

चोरटे, अवैध धंदेचालकांचा गावागावांत उच्छाद

Published on

कवठे येमाई, ता. ५ : टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत चोरी, हाणामारी, अवैध दारू आणि गुटखा विक्रीच्या घटनांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. पोलिस मात्र गुन्हेगारांच्या शोधा ऐवजी फक्त फिर्याद नोंदविण्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत. गावोगावी विद्युत रोहित्र, केबल आणि कृषिपंप चोरीचे सत्र सुरू असून, ‘तक्रार दिली की पोलिस उलट आम्हालाच प्रश्न विचारतात, परंतु गुन्हेगार मात्र सापडत नाही.’ अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. परिणामी, अनेक शेतकरी आता तक्रार देण्याचेही टाळत आहेत. चोरीच्या घटनांनी नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. तरी सुद्धा रात्रीची नियमित पोलिस गस्त ‘गायब’च आहे.
अवैध दारू आणि गुटखा विक्रीचा व्यवसाय मात्र टाकळी हाजी परिसरात दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. ‘पोलिस प्रशासनाला हे दिसत नाही का, की हेतुपुरस्सर दुर्लक्ष होतंय का’, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवैध धंदेवाल्यांची यादी तयार करून काही जणांकडून दरमहा ‘हप्ता’ वसूल केला जातो, अशी चर्चा सध्या रंगली आहे. कमी अधिक प्रमाणात तालुक्यातील इतर भागातही अशीच परिस्थिती असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर जास्त चर्चा झाल्याने काही कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. टाकळी हाजी दूरक्षेत्राला आंबेगाव, जुन्नर तालुक्याची आणि अहिल्यानगर जिल्ह्याची हद्द लागून असल्याने, चोरी करणारे टोळके सहजपणे या सीमेपलीकडे पळ काढतात.

अष्टविनायक महामार्गावर बळींचे सत्र थांबेना
मलठण, कवठे येमाई आणि सविंदणे परिसरातून जाणाऱ्या रांजणगाव-ओझर लेण्याद्री अष्टविनायक महामार्गावर साधारण दहा किलो मीटर अंतरावर गेल्या महिन्यात पाच ते सहा जणांचा अपघातात बळी गेला. मात्र, अनियंत्रित वेगावर व बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ना पोलिसांची कारवाई, ना कोणती सुरक्षा उपाययोजना. या परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातात बळी जाण्याचे हे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. तरी सुद्धा प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे.

शिरूर तालुक्यातील वाढत्या चोऱ्या, अवैध धंदे व गुन्हेगारीमुळे कायद्याचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. तीन पोलिस ठाण्यांसाठी स्वतंत्र उपविभागीय पोलिस अधिकारी असतानाही स्थिती गंभीर आहे. त्यामुळे तालुक्यात दबंग व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करावी, ही समाजहितार्थ मागणी आहे. अन्यथा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनानुसार आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल.
- नीलेश वाळुंज, सामाजिक कार्यकर्ता

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे ग्रामीण पोलिस दलाकडून अत्याधुनिक सुरक्षा ॲप तयार करण्यात आले असून, त्याच्या मदतीने नियमित रात्रगस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. चोरीच्या घटनांचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे सखोल तपास सुरू आहे. अवैध दारू धंद्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या माहितीबाबत थेट माझ्याशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल."
- प्रशांत ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी, शिरूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com