ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला

ग्रामस्थांच्या संयमाचा बांध अखेर फुटला

Published on

कवठे येमाई/जांबूत, ता. २४ : शिरूर तालुक्यात बिबट्याने अक्षरशः दहशत माजवली असून नागरिकांना जीवन जगणे मुश्कील झाले आहे. टाकळी हाजी बेट भागातील पिंपरखेड व जांबूत परिसरात १० दिवसांत दोन निरपराधांना बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच साडेपाच वर्षांच्या शिवन्या शैलेश बोंबे या चिमुरडीचा बळी गेल्यानंतर बुधवारी (ता. २२) जांबुत येथील भागुबाई रंगनाथ जाधव (वय ७०) यांच्यावर बिबट्याने झडप घालून अर्धा किलोमीटर ऊसाच्या शेतात फरफटत ओढून नेत ठार केले. या घटनेने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली असून नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर फुटला आहे.
संतापाचा कडेलोट झाल्यानंतर ग्रामस्थांनी पंचतळे येथे बेल्हा-जेजुरी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन छेडले. व जोपर्यंत जिल्हाधिकारी घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी घेतला होता. दरम्यान, अतिरिक्त जिल्हाधिकारी सतीश राऊत आणि पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी घटनास्थळी पोहोचून ग्रामस्थांची समजूत काढली. त्यांनी आठ दिवसांत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत घटनास्थळी येऊन बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. तदनंतर तब्बल १४ तासानंतर रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात भागुबाई जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जांबुत येथील भागुबाई जाधव यांच्या कुटुंबीयांची व परिसरातील ग्रामस्थांची घटनास्थळी जात माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, उपवनसंरक्षक संतोष खाडे, स्मिता राजहंस, उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी भेट घेत ग्रामस्थांशी संवाद साधला. मात्र, यावेळी संतप्त नागरिकांच्या तीव्र रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. दरम्यान, जांबूत परिसरात १३ पिंजरे तर पिंपरखेड येथे नऊ पिंजरे लावण्यात आले आहेत .


घटनास्थळी भेट देत नागरिकांशी संवाद साधला आहे. या संपूर्ण परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी यांना देणार आहे. बिबट्याच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तत्काळ सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, बाधित नागरिक यांची बैठक आयोजित करणार आहोत. येत्या आठ दिवसांत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत पुन्हा ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी येणार आहे. वाढत्या बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
- सतीश राऊत, अतिरिक्त जिल्हाधिकारी, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com