टाकळी हाजी पोलिस ठाण्याचा प्रस्ताव ‘लालफितीत’च
सागर रोकडे : सकाळ वृत्तसेवा
कवठे येमाई, ता. १३ : शिरूर तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शिरूर, रांजणगाव व शिक्रापूर पोलिस ठाण्यांचे विभाजन करून टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने सन २०२१-२२ मध्ये पोलिस महासंचालकांकडे सादर केला होता. त्या अहवालाच्या अनुषंगाने प्राप्त झालेल्या त्रुटींची पूर्तता करून वेळोवेळी सुधारित अहवाल पाठवण्यात आले. मात्र, तब्बल चार वर्षे उलटूनही हा प्रस्ताव अद्याप शासनाच्या टेबलवर पोहोचलेला नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अजून किती काळ ‘लालफिती’च्या फाइलींमध्येच धूळ खात पडून राहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
टाकळी हाजी व परिसरातील सुमारे २५ गावांमध्ये गेल्या काही वर्षांत लुटमार, दरोडे, आर्थिक गुन्हे, कृषी साहित्य चोरी, महिलांवरील अत्याचार तसेच अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सध्या तक्रार नोंदवण्यासाठी नागरिकांना शिरूर, शिक्रापूर किंवा रांजणगाव येथील पोलिस ठाण्यांत जावे लागत आहे. यामुळे वेळेचा अपव्यय तर होतोच; शिवाय तातडीच्या मदतीत अडथळे येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिरूर, शिक्रापूर व रांजणगाव पोलिस ठाण्यांचे विभाजन करून टाकळी हाजी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता.
या परिसरात टाकळी हाजी येथील मळगंगा माता आणि कवठे येमाई येथील येमाई माता अशी दोन मोठी धार्मिक स्थळे आहेत. मार्च-एप्रिलमध्ये यात्रा भरत असल्याने दरवर्षी मोठ्या पोलिस बंदोबस्ताची गरज भासते. तसेच बेल्हा-जेजुरी राज्य महामार्ग, अष्टविनायक महामार्ग आणि मलठण-कवठे येमाई-पारगाव-मंचर-भीमाशंकर हा मुख्य मार्ग येथून जात असल्याने वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. टाकळी हाजी परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत असून त्यामध्ये नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या परिसरात वारंवार कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
...म्हणून आहे गरज
टाकळी हाजीला अहिल्यानगर जिल्ह्याची व आंबेगाव, जुन्नर, पारनेर तालुक्यांची सीमा लागून असल्याने पुणे व अहिल्यानगर या दोन मोठ्या जिल्ह्यांतील गुन्हेगारांचा वावर या भागात वाढला आहे. परिणामी पोलिसांना वारंवार नाकाबंदी करावी लागत असून, स्वतंत्र पोलिस ठाण्याची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
वळसे पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र पण...
प्रशासनाने टाकळी हाजी पोलिस ठाण्याची गरज मान्य केली असली, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र आहे. लोकप्रतिनिधींचेही या गंभीर मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टाकळी हाजी येथे नवीन पोलिस ठाण्याची लवकरात लवकर निर्मिती करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला दिसून येत नाही.
हे प्रश्न उपस्थित
प्रस्ताव शासनापर्यंत कधी पोहोचणार?
नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार?
वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी सरकारचे ठोस प्रयत्न कधी दिसणार?
शिरूर तालुक्यातील पोलिस ठाणे व गावांची संख्या व हद्द (किमीमध्ये)
पोलिस ठाणे -- गावे-- हद्द
शिरूर -- ५३ -- १०६
शिक्रापूर -- ३५ -- ५५
रांजणगाव -- १३ -- २२
टाकळी हाजी परिसरातील गुन्ह्यांची संख्या
वर्ष -- गुन्ह्यांची संख्या
२०१९ -- ३१३
२०२० -- ३४८
२०२१ -- ३९१
२०२२ -- १७९
२०२३ -- २२२
२०२४ -- २३१
या २५ गावांना होणार फायदा
टाकळी हाजी, काठापूर, पिंपरखेड, जांबुत, चांडोह, फाकटे, सविंदणे, वडनेर खुर्द, कवठे येमाई, निमगाव दुडे, रावडेवाडी, म्हसे बु, डोंगरगण, अण्णापूर, आमदाबाद , मलठण, चिंचोली मोराची, शास्ताबाद, कान्हूर मेसाई, मिडगुलवाडी, वरुडे, सोनेसांगवी, वाघाळे, निमगाव भोगी, कर्डेलवाडी
दृष्टिक्षेपात
समाविष्ट गावे : २५
लोकसंख्या : ७१६७९
आवश्यक मनुष्यबळ : ४ अधिकारी, ४६ कर्मचारी
आवश्यक वाहने : ३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

