
कुरकुंडी सोसायटीवर मोहिते गटाचे वर्चस्व
पाईट, ता. १९ : खेड तालुक्यातील कुरकुंडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते गटाने गेली १५ वर्षाची विजयी परंपरा कायम राखत १२ पैकी ७ जागांवर विजय मिळविल्याची माहिती मुकाई महापरिवर्तन पॅनेलप्रमुख व माजी चेअरमन चिंधू महादू भोकसे यांनी दिली. तर, ५ अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली. भटक्या विमुक्त ही जागा रिक्त राहिली.
या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध भाजपने छुप्या पद्धतीने अपक्ष उमेदवारांना साथ देत निवडणूक लढवली, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. या निवडणुकीत एकूण ६४१ पैकी ५५० एवढे मतदान झाले. मोहिते गटाच्या मुकाई महापरीवर्तन पॅनेलच्या १२ उमेदवारांविरोधात १३ वेगवेगळ्या उमेदवारांनी तेरा निवडणूक चिन्ह घेऊन अपक्ष निवडणूक लढवत मतदारांना संभ्रमात टाकले होते. त्यामुळे ही निवडणूक आगळीवेगळी ठरली. मात्र, अपक्ष उमेदवारांच्या वेगवेगळ्या चिन्हांमुळे मते बाद होण्याचे प्रमाण सुमारे १० टक्क्यांपर्यंत वाढले. सर्व १२ विजयी उमेदवारांमध्ये ११ नवीन उमेदवारांचा समावेश असून, चिंधू भोकसे हे सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एम. धादवड यांनी; तर सहायक म्हणून संस्थेचे सचिव अर्जुन भोकसे यांनी कामकाज पाहिले. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी म्हाळुंगे इंगळे येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.
मुकाई महापरीवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- किसन बबुशा आवळे, मयूर कुंडलिक ढोरे, इंदाराम विठ्ठल भोकसे, चिंधू महादू भोकसे, सचिन पोपट भोकसे, आशाबाई मारुती ढोरे आणि गिरिधर दादू वाघमारे.
अपक्ष विजयी उमेदवार- बबन मारुती भोकसे, योगेश रामदास भोकसे, शिवाजी जयवंत राळे, चंद्रकला दत्तात्रेय जाधव, महेंद्र चंद्रकांत आवळे.